
>> अरुण मालेगावकर
‘विठ्ठला, तू वेडा कुंभार’ असे गदिमांनी म्हटले आहे. त्या कुंभकाराचे महत्त्व प्राचीन काळात होते. आता आहे, यापुढेही कायम राहील. सोन्याचांदीची भांडी मोठ्या लोकांची, पण गरीबाकडे असतात गाडगीमडकी. पुराणग्रंथांमध्ये प्रजापती हा कुंभार असल्याची माहिती मिळते. जातवास्तवाचा शोध घेणे हे केव्हाही जिकिरीचे काम असते. असंख्य ग्रंथांमध्ये संदर्भ शोधून ते मांडताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. ती दक्षता विलास राजे या संशोधकाने घेतली आहे. ‘प्रजापती कुंभार’ या ग्रंथाचे एक शोधग्रंथ म्हणून महत्त्व मोलाचे आहे.
भगवान दक्ष प्रजापती (भगवान शंकराचे सासरे आणि त्याची पहिली पत्नी सती हिचे पिताश्री!) यांनी सर्वप्रथम कुंभनिर्मिती केली. मात्र कालांतकराने कुंभार ज्ञातीला समाजापासून दूर ठेवले जाऊ लागले. सध्या त्यांच्या जगभरात अनेक उपजाती आहेत. त्यातही मुस्लिम आहेत. युरोपियन ख्रिस्ती धर्मीय असून त्यांची संक्षिप्त ऐतिहासिक माहिती वाचनीय आहे.
कुंभार बांधवांचे देव कोणते, देवता कोणत्या त्यांच्या श्रद्धा (आणि अंधश्रद्धासुद्धा!) कोणत्या हेही एक अभ्यासक म्हणून विलास राजे यांनी नोंदविल्या आहेत. अखेरच्या प्रकरणात रत्नाप्पा कुंभार, देवराज अरस, न्यायमूर्ती एन. कुमारय्या वगैरे देशी आणि प्रा. सूत झल्ली, मियाँ मुनीर रहमानी वगैरे विदेशी थोऱयामोठय़ांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. ज्ञानाबरोबरच हे पुस्तक उद्बोधक आहे.
प्रजापती कुंभार
लेखक – विलास राजे
प्रकाशन – संवेदना प्रकाशन, पुणे
पृष्ठ – 112, मूल्य – रुपये 160/-
























































