पर्यटनातून 27 अरब डॉलर्सची कमाई,1.39 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

मागील वित्तीय वर्षात पर्यटनातून हिंदुस्थानने तब्बल 1.89 लाख कोटींची (27 अरब डॉलर्स) कमाई केली आहे. तर 1.39 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान 5.7 टक्के इतके असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोन्स यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनामध्ये 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. हिंदुस्थानात ही वाढ 14 टक्के आहे. जगभरातील विविध देशांना पर्यटनातून मिळणाऱ्या कराचे प्रमाण 5 टक्के तर हिंदुस्थानात ते 19.2 टक्के इतके आहे. 2017-18 या वित्तीय वर्षात देशातील एकूण रोजगारामध्ये पर्यटन क्षेत्राचे योगदान 12.36 टक्के इतके आहे.

विदेशी पर्यटकांसाठी खास योजना

हिंदुस्थानात फिरण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांसाठी खास योजना  असल्याची माहिती अल्फोन्स यांनी दिली. दरवर्षी सुमारे 2.5 कोटी हिंदुस्थानी पर्यटक परदेशात फिरण्यासाठी जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

केवळ 2.47 लाख चिनी पर्यटक हिंदुस्थान भेटीवर

गेल्या वर्षी चीनमधील 14.4 कोटी पर्यटक इतर देशांत फिरण्यासाठी गेले होते. यातील केवळ 2.47 लाख पर्यटक हिंदुस्थानात आले. येत्या पाच वर्षांत चीनमधील 10 टक्के पर्यटक हिंदुस्थान भेटीवर यावेत हे लक्ष्य पर्यटन मंत्रालयासमोर आहे. वर्ष 2020 पर्यंत हे लक्ष्य 2 कोटी, 2025 मध्ये 3 कोटी आणि 2026 मध्ये 4 कोटी असे असणार आहे.

पर्यटनात तामीळनाडू आघाडीवर

केरळला मागे टाकत तामीळनाडूने देशांतर्गत पर्यटनात बाजी मारली आहे. केरळच्या महसुलात 18 टक्क्यांची घट झाली असून तामीळनाडूकडे पर्यटकांचा ओढा वाढत आहे.

उत्तर प्रदेश, बिहारमधील बौद्ध पर्यटनस्थळे जोडणार

जगातील 50 कोटी बौद्ध पर्यटकांना हिंदुस्थान भेटीसाठी आकर्षित करण्याचा पर्यटनमंत्र्यांचा विचार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील बौद्ध पर्यटनस्थळे एकमेकांना जोडण्यात येणार आहेत.