
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदळाने भरलेल्या भरधाव ट्रकने कंटेनर आणि कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये ट्रकचालक, क्लिनरचा जागीच मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पुण्याहून मुंबईकडे तांदळाने भरलेला ट्रक जात होता. त्यावेळी बोरघाटात ट्रक येताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक थेट पुढे असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळला. त्यानंतर अनियंत्रित ट्रकने बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारला धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. तसेच लीलाबाई सस्ते, मुकिंदा सस्ते आणि महेंद्र पाल हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोली ग्रामीण, एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वाहतूक सुरळीत
अपघातानंतर तांदळाने भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. तांदळाच्या गोण्या आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, आय. आर. बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाऊंडेशन आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत केली.




























































