
मुंबई सेंट्रल स्थानकानजीक लोकल ट्रेन घसरल्याची घटना ताजी असतानाच रविवारी मरिन लाईन्स स्थानकात भीषण अपघात टळला. चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकलचे कपलिंग तुटल्याने तीन डबे वेगळे झाले. सुदैवाने गाडी स्थानकात जात असल्याने वेग कमी होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, सकाळी 11 च्या सुमारास झालेल्या या खोळंब्यामुळे डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक तब्बल सवादोन तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या आठ दिवसांपासून खार-गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या मार्गिकेसाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक लोकल ट्रेन रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यातच आज सकाळी 11.02 वाजता चर्चगेटहून बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल मरिन लाईन्स स्थानकात जात असतानाच गाडीला झटका बसल्याने चर्चगेटच्या बाजूचे तीन डबे वेगळे झाले. त्यामुळे मोटरमनने तत्काळ ब्रेक लावल्याने अनर्थ टळला. या खोळंब्यानंतर तत्काळ वेगळे झालेल्या डब्यातील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. सवादोन तासांनंतर दुपारी 1.11 वाजता ही लोकल कारशेडमध्ये हलवल्यानंतर लोकल सेवा पूर्ववत झाली.
चौकशीचे आदेश
पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचे कपलिंग तुटल्याच्या घटनेची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित विभागाचे अधिकारी कारशेडमध्ये जाऊन लोकलच्या तुटलेल्या कपलिंगची पाहणी करणार आहेत.





























































