चिडखोर बापाला संपवला; क्राईम पेट्रोल पाहून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला

murder

रागाच्या भरात एका 17 वर्षांच्या मुलाने चिडखोर वडिलांची हत्या करून क्राईम पेट्रोल सिरीयलचे भाग पाहून मृतदेह आणि हत्येचे पुरावे नष्ट केले. पुरावे नष्ट केल्य़ाने तो पाच महिन्यांपर्यंत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला मदत केल्याप्रकरणी त्याच्या आईलाही अटक करण्यात आली आहे. आग्र्यातील वृंदावन भागात ही घटना घडली आहे.

मनोज मिश्रा (वय 42) इस्कॉनमध्ये देणगी गोळा करून पावती देण्याचे काम करत होते. मुलाच्या हातून भांडी पडल्याच्या आवाजाने 2 मे रोजी सकाळी मनोज यांना जाग आली. रागाच्या भरात त्यांनी 17 वर्षांच्या मुलाला आणि 11 वर्षांच्या मुलीला बदडून काढले. वडिलांनी मारल्याने मुलाला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने वडिलांच्या डोक्यावर वार केले. त्यामुळे मनोज बेशुद्ध पडले. त्यानंतर मुलाने कपड्याने त्यांचा गळा आवळला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांची हत्या केल्यानंतर रात्री आईच्या मदतीने त्याने वडिलांचा मृतदेह स्कूटीवर पाच किलोमीरवर असलेल्या वैष्णोदेवी धामच्या जंगलात नेला. मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी मृतदेहावर अॅसिड असलेले क्लीनर टाकले. त्यानंतर दोन लिटर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला. त्यानंतर अडीच किलोमीटर अंतरावर निर्जन शेतात त्याने रॉड, कापड आणि इतर पुरावे जाळून नष्ट केले. 3 मे रोजी पोलिसांना अर्धवट जळलेला मृतदेह सापडला. तीन आठवड्यापर्यंत त्याची ओळख पटवता आली नव्हती. कोणत्याही पोलीस ठाण्यात हरवलेल्या किंवा बेपत्ता झालेल्याची तक्रार दाखल झाली नवहती. त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते.

मनोज यांच्या कुटुंबियांनी 27 मे रोजी इस्कॉनच्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली मनोज बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तीन दिवसानंतर मुलीने आणि काही सहकाऱ्यांनी मनोज यांचा मृतदेह चष्मा आणि मृतदेहाशेजारील काही वस्तूंच्या मदतीने ओळखला. मनोज भगवद्गीतेच्या उपदेशासाठी बाहेरगावी जात होते. त्यावेळी ते बरेच दिवस बाहेरगावी असायचे. आताही ते बाहेरगावी असतील असे वाटल्याने इतके दिवस तक्रार दाखल केली नसल्याचे मनोज यांच्या मुलीने आणि सहकाऱ्यांनी सांगितले.

पोलिसांनी मुलाला चौकशीसाठी बोलावले तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याच्या पोलिसांच्या लक्षात आले. तसेच कायद्याच्या तरतूदी सांगत आपली चोकशी करणे अयोग्य असल्याचा त्याचा दावा होता. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी त्याच्या फोनची हिस्ट्री तपासली. त्यात मुलाने सुमारे 100 वेळा क्राइम पेट्रोलचे भाग पाहिल्याचे दिसून आले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी आईने मदत केल्याचेही सांगितले. याप्रकरणी मुलगा आणि त्याची आई संगीता मिश्रा (वय39) यांच्यावर हत्येचा आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुलाच्या 11 वर्षांच्या बहिणीला सध्या आजीकडे पाठवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या