शेळीच्या पिल्लाला वाचविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्याने गमावले प्राण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, भोकरदन

तालुक्यातील वाडी चोरमारे येथे नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडलेल्या करडूला (शेळीचे पिल्लू) वाचविण्याच्या प्रयत्नात दोरी सुटल्यामुळे विहिरीत डोक्यावर पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील वाडी चोरमारे येथील शालिकराव भुजंगराव ठाले यांचा एकुलता एक मुलगा नकुल हा नववीच्या वर्गात शिकतो. बुधवारी नकुल ठाले हा भिंपूर येथील मंगळवेढा येथे यात्रेत आला होता. यात्रेहून परतत असताना दुपारी चार वाजता गोठ्यात बांधलेल्या शेळ्या व त्यांच्या पिलांना वैरणीसाठी सोडले. त्यातील एका करडू चरता चरता विहिरीत पडले. शेळीचे करडू पडल्याने नकुलने दोरीच्या साहाय्याने त्याला वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले.

नकुल विहिरीत अर्ध्यावर गेला, पण दोरीवरून त्याचा ताबा सुटल्यामुळे तो पाण्यामध्ये कोसळला. त्यातच त्याच्या डोक्याला मार लागून तो सरळ विहिरीच्या तळाशी गेला व मृत्युमुखी पडला. या अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळपर्यंत कुणालाही मिळाली नाही. यात्रेला गेलेला नकुल रात्री नऊ वाजले तरीदेखील घरी परत न आल्यामुळे आई-वडिलांसह ग्रामस्थांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. त्यावेळी शेळ्यांच्या कळपातील एक करडू गायब असल्याने नागरिकांनी विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर पाण्यावर तरंगताना आढळून आले. विहिरीच्या काठावर नकुलचे काढलेले कपडेदेखील दिसून आले. ग्रामस्थांनी विहिरीत असलेले पाणी उपसून काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर नकुलचा मृतदेह विहिरीमध्ये आढळला.