
चीनच्या वुहानमधून कोरोना व्हायरस पसरला आणि साऱ्या जगाची घडीच बिघडली. याआधी अशी स्थिती कधीही कुणीही पाहिली नव्हती किंवा ऐकलंही नव्हतं. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सामाजिक अंतर राखणं अधिक आवश्यक असल्याने मानवी स्पर्शातील ऊब मिळणं कठीण बनलं असून रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत चालली आहे.
जे कोरोनाग्रस्त आहे त्यांच्यासाठी हे अधिक कठीण आहे. त्यांना या कठीण काळात त्यांचे दिवस त्यांच्या कुटुंबीय आणि आप्तेष्टांपासून दूर अलिप्तपणे घालवावे लागतात. त्यांची ती भयंकर स्थिती डॉक्टर आणि परिचारिकाच समजू शकतात. अनेकदा या एकटे राहिल्याने त्यांना हवी असलेली स्पर्शाची ऊब मिळत नाही. त्यांना एक उबदार आलिंगन मिळाले किंवा फक्त त्यांच्या हातात हात दिला तर त्यांना मोठा आधार मिळेल असं लक्षात येतं.
ब्राझीलमध्ये, तेथील रुग्णालयात असलेल्या परिचारिकांनी व्हायरसने बाधित झालेल्यांना ‘मानवी स्पर्शा’चा अनुभव देण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधून काढला.
हे करण्यासाठी कुठल्या तंत्रज्ञानाची गरज भासली नाही. ही उणिव दूर करण्यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली. त्यांना फक्त दोन डिस्पोजेबल हातमोजे (Hand gloves) आवश्यक होते. ते हातमोजे एकत्र बांधून घेतले आणि कोमट पाणी त्यात ओतलं गेलं. त्यानंतर, ते रुग्णाच्या हातात हात देतात तसे ठेवण्यात आले, ज्यामुळे त्यांच्यातील एकटेपणाची भावना दूर झाली.
ही माहिती गल्फ न्यूजचे संपादक सादिक भट यांनी पोस्ट केली होती.
या पोस्टमध्ये त्यांनी कॅप्शन लिहिली होती, “बाझ्रिलमधील कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये नर्स रुग्णांचा एकटेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्यांनी हँडग्लोजमध्ये कोमट पाणी भरून ते हातात हात धरल्याप्रमाणे बांधले. फ्रंटलाइनवर काम करताना अशी माणूसकी जपणाऱ्या अशा कोरोना योद्धांना सलाम!” इतकंच नाही तर त्यांनी या हाताला ‘देवाचा हात’ असं म्हटलं आहे.’
हा फोटो म्हणजे निराशेचे ढग जमा झालेले असताना आशेचा एक किरणच आहे. ज्याच्यामुळे आजूबाजूचे नैराश्य दूर होण्यास मदत होते आहे, अशा प्रतिक्रिया या फोटोवर येत आहेत.
ब्राझिलमधल्या परिचारीकांच्या या कृतीचे कौतुक साऱ्या जगभरात होत आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरला झाला आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘हा फोटो हृदयाला भिडतो, डोळ्यात पाणी आणतो.’, असं काहींनी म्हटलं आहे. ‘हे चित्र पाहून वाटतं आपले लोक मास्क वापरायला आणि सामाजिक दूरीचं भान ठेवण्यास शिकणार तरी कधी?’, असं एका यूझरनं म्हटलं आहे.




























































