महाराष्ट्राची बाकरवडी ते बंगालची कुचो निमकी; BRICS शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांसाठी खास मेजवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी दिल्ली येथे 12 आणि 13 सप्टेंबर रोजी पार पडणाऱ्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी हिंदुस्थान सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इंडोनेशिया, इराण आणि यूएई या देशांच्या प्रमुखांचे आणि प्रतिनिधींचे स्वागत करणार आहेत. भारत मंडपम येथे ही परिषद होत असून या निमित्ताने नवी दिल्लीतील अलिशान हॉटेल्सनी परदेशी पाहुण्यांसाठी हिंदुस्थानी संस्कृती आणि विविधतेची झलक दाखवणारा खास मेजवाणी तयार केली आहे. ताज महाल, द लीला पॅलेस आणि द ललित या हॉटेल्सनी हिंदुस्थानमधील प्रादेशिक चवींसह आंतरराष्ट्रीय फ्लेव्हर्सचा मेळ घालत एक खास मेजवाणी तयार केली आहे, असे वृत्त ‘एनडीटीव्ही‘ने दिले आहे.

नवी दिल्लीतील ताज महाल हॉटेलने ट्रेडिशन टू टेबल ही संकल्पना सादर केली आहे. यामध्ये शेफच्या आईच्या पाककृतींपासून प्रेरित होऊन हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या भागांतील प्रसिद्ध चवदार पदार्थ पाहुण्यांना दिले जाणार आहेत. यात महाराष्ट्राची खमंग आणि मसालेदार बाकरवडी, बंगालची कुरकुरीत कुचो निमकी, काश्मीरचे मसालेदार अक्रोड, राजस्थानची मिनी कचोरी, तामिळनाडूचे पारंपरिक मुरुकू (चकलीसारखा पदार्थ) आणि जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध मैदा काजू याचा समावेश आहे.

गुलाब, केशर अन् वेलचीचे खाण्यायोग्य कमळ

द लीला पॅलेस हॉटेलने हिंदुस्थानचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाची संकल्पना मांडली आहे. BRICS शिखर परिषद 2026 च्या थीमशी सुसंगत असे हँडक्रॉफ्टेड एडिबल कमळ तयार करण्यात आले आहे. हे कमळ गुलाब, केशर आणि वेलचीपासून बनवले असून ते स्थानिक फळांसोबत वाढले जाईल. याशिवाय आरोग्यदायी आहारावर भर देत लीला पॅलेसने औजस्य ब्रँड अंतर्गत भरड धान्यांची कुकीज, हँडमेड ग्रॅनोला बार आणि वेलनेस इन्फ्युझन्स अर्थात हर्बल टी पाहुण्यांसाठी तयार केले आहेत.

ग्लोबल फ्लेव्हर्स

द ललित हॉटेलने पारंपरिक पदार्थांना जागतिक ट्विस्ट दिला आहे. येथे लखनौचे प्रसिद्ध गलोटी कबाब आणि तंदूर-बेक्ड ब्रेड्स यांसारख्या लोकप्रिय हिंदुस्थानी पदार्थांसह भरड धान्यांपासून बनवलेले विविध पदार्थ असतील. परदेशी प्रतिनिधींच्या आवडीचा विचार करून हॉटेलने काही आशियाई आणि फ्युजन पदार्थही समाविष्ट केले आहेत.