
लग्नाचा दिवस हा प्रत्येकासाठी स्पेशल असतो. पाहुण्यांची यादी करण्यापासून ते लग्नामध्ये मेन्यू काय असावा, सजावट कशा प्रकारची असावी याची लगीनघरात महिनाभर आधीपासूनच लगबग सुरू असते. इतकी सगळी तयारी करूनही लग्नात एखादा जवळचा पाहुणा आला नाही तर सगळी मेहनत वाया गेली असे वाटते. आपल्या लग्नसोहळ्यात गैरहजर राहिलेल्या अशाच काही पाहुण्यांना भडकलेल्या नवरीने चक्क 17 हजार रुपयांचे बिल पाठवले आहे. त्यामुळे पाहुणे मंडळींनादेखील शॉक बसला आहे.
लंडनमध्ये ही घटना घडली आहे. निमंत्रित केलेले पाहुणे लग्नात गैरहजर राहिल्यामुळे वाया गेलेले जेवण आणि इतर वस्तूंचा खर्च वसूल करण्यासाठी नवरीने हे बिल पाठवले आहे. हे पैसे तुम्हाला द्यावेच लागतील. कारण लग्नाला गैरहजर राहण्याबाबत तुम्ही कोणतीही पूर्वकल्पना आम्हाला दिली नव्हती. तुम्ही ऑनलाइनदेखील पेमेंट करू शकता किंवा कशा प्रकारे बिलाचे पैसे भरणार हे सांगण्यासाठी आम्हाला संपर्प करू शकता अशी नोट नवरीने या बिलावर लिहिली आहे. सोशल मीडियावर हे बिल तुफान व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्स मजेशीर कमेंट करत आहेत.




























































