ईशान्य हिंदुस्थानात सर्जिकल स्ट्राइकची गरज

>>ब्रिगेडियर हेमंत महाजन

हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे ईशान्य हिंदुस्थानात 2014-19 च्या वर्षात हिंसाचार अतिशय कमी झाला आहे, परंतु याचा अर्थ तिथे सगळे शांत आहे असे नाही. आज ईशान्य हिंदुस्थानमध्ये आर्थिक क्रांती होत आहे. तिथे नवीन रस्ते, रेल्वेलाइन, विमानतळ असे अनेक प्रकल्प सुरू आहे. जेवढे रस्ते गेल्या 70 वर्षांमध्ये बांधले नव्हते, त्याच्या पाचपट जास्त रस्ते आता तिथे बांधण्यात येत आहेत. रस्ते बांधल्यामुळे व्यापार, पर्यटन आणि इतर विकासकामे यांना वेग येऊ शकतो, परंतु यामध्ये विघ्न घालण्याचे काम चीन करत आहे. आपण म्यानमारच्या सैन्याबरोबर आणखी काही लष्करी मोहिमा किंवा सर्जिकल स्ट्राइक का करत नाही?

अरुणाचल प्रदेशमधील नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार तिरोंग अबो, त्यांचे पुत्र आणि काही अंगरक्षकांची 21 मे रोजी हत्या झाली. अबो हे एनपीपीचे खोन्सा पश्चिम येथील आमदार होते. अरुणाचलच्या या भागात बंडखोर संस्था ‘नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड – इसाक मुईवा’ (एनएससीएन-आयएम) गटाच्या कारवायांच्या विरोधात अबो यांनी अनेकदा आवाज उठवला होता. एनएससीएन-आयएम या फुटीरतावादी संघटनेने हा हल्ला केला असावा. तिरोंग यांची हत्या करण्याचा प्रयत्न या संघटनेने यापूर्वी दोनदा केला होता. नागांच्या वेगळ्या भूमीसाठी दहशतवादाचा मार्ग अवलंबलेला कट्टरपंथीय गट रक्तरंजित संघर्षावर भर देत आहे. एनएससीएन-आयएम गटाने सध्या सरकारशी शांतता करार केला आहे.
काही दिवस आधी अबो यांच्या एका कार्यकर्त्याची आणि लोंगडिंग जिल्हय़ातील एका जिल्हा परिषद सदस्याची हत्या झाली होती. त्या हत्यांबाबतही संशय एनएससीएन-आयएमवरच व्यक्त केला गेला होता. त्यानंतर आसाम रायफलच्या दोन जवानांचा एनएससीएन-केच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

हल्ल्याची दोन मुख्य कारणे होती. बंडखोर गटांना आपल्या हद्दीमध्ये बाहेरचे कोणी येऊन निवडणुका लढवत होते हे आवडलेले नव्हते. दुसरे, गेल्या पाच वर्षांमध्ये ईशान्य हिंदुस्थानमध्ये हिंसाचार खूप कमी झाला आहे. म्हणून चीन आणि पाकिस्तानला या भागामध्ये हिंसाचार वाढवून अशांतता पसरवायची आहे. अबो यांच्यावर हल्ला कुणाकडून झाला याचा आम्हीदेखील शोध घेत आहोत अशी भूमिका एनएससीएन-आयएमच्या प्रचार-प्रसिद्धी विभागाने घेतली आहे. म्हणजेच हा हल्ला आम्ही केला नाही असे त्यांना म्हणायचे आहे.

एनएससीएन संघटनेतील नेमस्तांशी चर्चा करण्याचा प्रयत्न 2015मध्ये मोदी सरकारने केला होता. त्यावेळी या संघटनेने शांतता करार केला होता आणि शस्त्रास्त्रs खाली ठेवण्याची तयारी दर्शविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कराराला ‘ऐतिहासिक’ संबोधले होते आणि ईशान्येकडे एका नव्या युगाचा प्रारंभ होत असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर अल्पावधीतच कराराचा भंग करताना ‘एनएससीएन-केने ईशान्येकडील अन्य फुटिरांशी हातमिळवणी केली आणि हिंसाचार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले.

ईशान्य हिंदुस्थानात मोडणारी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्ये भू-राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाची आहेत. हा प्रदेश उर्वरित हिंदुस्थानशी जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्टय़ाने जोडलेला आहे, जो पश्चिम बंगाल राज्यातील सिलिगुडी जिह्यात येतो. याशिवाय या आठ राज्यांमध्ये मिळून देशाची सुमारे पाच हजार 180 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ज्याभोवती बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन असे पाच देश आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही आठही राज्ये कुठल्या ना कुठल्या देशाशी जोडलेली आहेत. अर्थात, प्रत्येक पूर्वोत्तर राज्य हे ‘सीमावर्ती’ राज्य आहे.

हिंदुस्थानी लष्कराने 9 जून 2015 रोजी म्यानमार सीमा ओलांडून बंडखोरांच्या दोन छावण्या उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यात शंभरहून अधिक बंडखोर मारले गेले होते. 4 जून 2015 रोजी बंडखोरांच्या एका हल्ल्यात मणिपूरमधील चंदेल भागात 18 हिंदुस्थानी जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून लष्कराने म्यानमारमध्ये घुसून ही थेट कारवाई केली होती. याचवेळी म्यानमार सैन्य त्यांच्या बाजूने या दहशतवादी कॅम्पवर हल्ला करत होते. यामध्ये एनएससीएन खापलांग यांचे मुख्यालय बरबाद करण्यात आले. त्यांच्या अनेक नेत्यांना पकडण्यात म्यानमार सैन्याला यश मिळाले .

नागालँडमधले अनेक बंडखोर गट सध्या हिंदुस्थान सरकारबरोबर वाटाघाटी करण्यामध्ये गुंतले आहेत आणि ते हिंसाचार करत नाही. मात्र एनएससीएन खापलांग गट हा अजून वाटाघाटीकरिता तयार नाही. चीनने म्यानमार आणि हिंदुस्थानमध्ये असलेल्या बंडखोर आणि दहशतवादी गटांना एकत्र आणण्याकरिता नॉर्दन अलायन्स नावाची संघटना तयार केली आहे. चीनने त्यांच्या सीमेजवळ तीन हजार बंडखोरांना तयार ठेवले आहे. ऑपरेशन सनराईसमध्ये म्यानमारच्या सैन्याने उल्फा यांच्या ट्रेनिंग कॅम्प जो पडती येथे आहे, त्यावरसुद्धा हल्ला केला. यामध्ये उल्फाचे अनेक महत्त्वाचे नेते मारले गेले.

हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे ईशान्य हिंदुस्थानात 2014-19 च्या वर्षात हिंसाचार अतिशय कमी झाला आहे, परंतु याचा अर्थ तिथे सगळे शांत आहे असे नाही. आज ईशान्य हिंदुस्थानमध्ये आर्थिक क्रांती होत आहे. तिथे नवीन रस्ते, रेल्वेलाइन, विमानतळ असे अनेक प्रकल्प सुरू आहे. जेवढे रस्ते गेल्या 70 वर्षांमध्ये बांधले नव्हते, त्याच्या पाचपट जास्त रस्ते आता तिथे बांधण्यात येत आहेत. रस्ते बांधल्यामुळे व्यापार, पर्यटन आणि इतर विकासकामे यांना वेग येऊ शकतो, परंतु यामध्ये विघ्न घालण्याचे काम चीन करत आहे.

आपण म्यानमारच्या सैन्याबरोबर आणखी काही लष्करी मोहिमा किंवा सर्जिकल स्ट्राइक का करत नाही? हीच वेळ आहे म्यानमारमध्ये असलेल्या हिंदुस्थानच्या विरुद्ध कारवाई करणाऱया दहशतवादी गटांना बरबाद करायची. ईशान्य हिंदुस्थानच्या जाती आणि जमाती उत्कृष्ट लढवय्या आहेत. त्यामुळे जर चीनने ईशान्य हिंदुस्थानमध्ये पुन्हा बंडखोरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर तो आपल्याकरिता धोकादायक ठरू शकतो.

सत्तरच्या दशकामध्ये अनेक दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प चीनच्या युनान प्रांतामध्ये होते. हे ट्रेनिंग कॅम्प सध्या फक्त म्यानमारमध्ये आहेत. म्हणूनच जर ईशान्य हिंदुस्थानमध्ये शांतता हवी असेल तर म्यानमार सैन्याच्या मदतीने आपल्याला तिथे असलेल्या ट्रेनिंग कॅम्प विरुद्ध मोठय़ा प्रमाणामध्ये कारवाई केली पाहिजे.

लुक ईस्ट किंवा ऍक्ट ईस्ट या पॉलिसीप्रमाणे येणाऱया काळामध्ये या देशांची आपले व्यापारी संबंध रस्ते आणि रेल्वेलाइनचा वापर करून वाढवणार आहे. याकरिता ईशान्य हिंदुस्थानचे बंडखोर गट चीनच्या मदतीने आपल्याला त्रास देऊ शकतात. म्हणूनच गरज आहे की, अशा सगळ्या गटांना बरबाद करून या भागांमध्ये शांतता निर्माण करायची. कदाचित निवडणुकीनंतर मोठे हल्ले म्यानमारच्या जंगलात केले जातील. त्यामुळे तिथे असलेल्या वेगवेगळ्या बंडखोर गटांना मोडण्यामध्ये आपल्याला यश मिळेल व ईशान्य हिंदुस्थान आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करील.
hemantmahajan@yahoo.co.in