
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
देशातील जनतेचा आता संयम सुटलाय. राम मंदिरासाठी कायदा आणा. नाहीतर जनताच राममंदिर बांधायला सुरूवात करेल, असा इशारा योगगुरू रामदेव बाबा यांनी दिला आहे. सध्या देशभरात राम मंदिर निर्माणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना राममंदिराची आठवण करून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. तसेच विश्व हिंदू परिषद आणि आरएसएसच्या वतीने राम मंदिरासाठी 25 तारखेला अयोध्येत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रामदेवबाबांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
आता जनतेची सहनशक्ती संपली आहे. यामुळे सरकारने राम मंदिर उभारण्यासाठी कायदा आणणे गरजेचे आहे. नाहीतर जनता स्वत:च्या हिंमतीवर मंदिर उभारेल आणि जर असं झालं तर सामाजिक एकतेचा भंग होईल. यामुळे वातावरण बिघडेल. मला विश्वास आहे की देशात राम मंदिराला कोणीही विरोध करणार नाही. सगळे हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन त्याचेच वंशज आहेत, असेही बाबांनी म्हटले आहे.
दरम्यान याआधीही बाबा रामदेव यांनी राम मंदिरावर भाष्य केले होते. राम मंदिर उभारले गेले नाही तर यादवी माजेल. राम मंदिर निर्माणचा मार्ग हा सर्वोच्च न्यायालयातून नाही तर संसेदतून जायला हवा. सरकारने यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा जनतेच्या सहनशीलतेचा अंत होईल ते आता जास्त प्रतिक्षा करू शकत नाहीत. असे बाबांनी मुझफ्फरनगर येथे म्हटले होते.
Ppl have lost patience. Bring a law for #RamMandir or else people will start building it on their own. If people do that, communal harmony could be disturbed. I believe there is no opposition to Ram in country, all Hindus, Muslims & Christians are his descendants: Yog Guru Ramdev pic.twitter.com/fBSgDvyAKU
— ANI (@ANI) November 24, 2018

























































