
रात्री झोपण्यापूर्वी दात घासावेत असे लहानपणापासून आपल्याला सांगण्यात आले आहे. मात्र याचे देखील काही नियम आहेत. जेवणानंतर लगेच ब्रश करायची सवय असेल तर आधीच सावध व्हा. तुमच्या दातांचे नुकसान होऊ शकते. दातांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असल्यास रात्री जेवल्यानंतर किमान तासभराने दात घासावेत.
रात्री झोपण्यापूर्वीचं महत्वाचे काम म्हणजे दात घासणे हे असावं. पण हे एक ब्रश करायचं काम लवकरात लवकर उरकावं म्हणुन जेवण झाल्या नंतर लगेच दात घासत असाल तर हे टाळावं. शक्यतो जेवणानंतर किमान अर्धा -पाऊण तासाने दात घासलेलं उत्तम. दातांच्या बाहेरचा थर म्हणजेच इनॅमल हा शरीरातील सर्वात मजबूत घटक मानला जातो. जो आपल्या दातांना प्रोटेक्ट करतो.पण हा थर जेवतेवेळी व जेवल्यानंतर त्याच्या सर्वात कमजोर परिस्थितीत असतो. यासाठी कारण म्हणजे
– जेवणातील अॅसिडिक, साखर युक्त पदार्थामुळे आपल्या तोंडातील ph लेव्हल कमी होतो. म्हणजेच अॅसिडिक pH वाढतो. दातावर अॅसिड असतं. जर आपण जेवणानंतर लगेच दात घासले तर हे अॅसिड आपण सर्व दातांवर पसरवतो. ज्यामुळे दातांची झीज होऊ शकते.
– आपल्या शरीराच्या इतक्या किमया भारी आहेत ना. आपलं शरीर हा जेवणानंतर तयार झालेल्या अॅसिडिक pH ला संतुलित करण्यासाठी जास्त प्रमाणात लाळ तयार करतं .ज्याने हे अॅसिड साफ होईल. आपली लाळ अन्नाचे कण, प्लाक, काढुन टाकते जेणेकरून इनॅमल दाताला व्यवस्थित संरक्षित ठेवेल .
– दात घासताना जरी तुम्ही सॉफ्ट ब्रिस्टल चा ब्रश वापरात असाल तरीही दातांची झिज होईलच. यासाठी जेवणानंतर अर्धा पाऊण तास आपल्या लाळेला तिचं काम करू द्या. यासाठी काही मदत करायची असेल तर जेवणानंतर पाण्याने स्वच्छ गुळण्या करा किंवा साखर नसलेलं चुविंग गम खा. यामुळे लाळ तयार होण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढेल.
– द्राक्ष, संत्री, लिंबु खाल्ल्यावर लगेच दात घासण्याऐवजी कमी साखरेचे काही खावे. मग अर्ध्या तासाने दात घासावे.
– सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये असणाऱ्या फोसफेरिक अॅसिडमुळे इनॅमल आणि तोंडातील टिशू या अॅसिड ला उघडे होतात आणि यामुळे कायमस्वरूपी दातांचे इनॅमल मोठया प्रमाणात झीजतं.
# ADA (अमेरिकन डेंटल अससोसिएशन )नुसार तर जेवणानंतर किमान ६०मिनिटे थांबुन मग दात घासावे.
काही व्यक्तींना एक प्रयोग करण्यासाठी तीन आठवडे जेवणानंतर व डाएट सोडा पिऊन २०मिनिटे पुर्ण होण्याआधीच दात घासायला लावले. परिणामी या लोकांमध्ये दातांची झीज जास्त जाणवली. यातून असे समजले की, असं लगेच दात घासून आपण अॅसिड दातांच्या थरामध्ये पोहचवतोय आणि त्यांना झिजवतोय. दात कधी घासावेत कसे घसावेत ही कटकट कोण लावुन घ्यावी म्हणून काहीजण रात्री दात घासतच नाहीत. मग त्याच्या तोंडात अन्नाचे बारीक कण तसेच राहून सडून जाऊन काही बॅक्टरीयाज रात्रभर तिथे राहून स्वतःचं घर करतात. ते घर एकाच वेळी दात घासून नष्ट करणे शक्य नसते. रात्री दात घासले असतील तर सकाळी अगदी हलक्या हाताने कमी वेळात ब्रश केला तरीही चालतं.
Quora या प्रश्नोत्तरांच्या संकेतस्थळावर विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना दंतवैद्य विशाखा देशमुख यांनी उत्तर दिले आहे.




























































