
देशाच्या कानाकोपऱयापर्यंत टेलिफोन आणि इंटरनेट सेवा देणाऱया बीएसएनएलची सेवा आता मुंबई आणि दिल्ली या दोन्ही महानगरांमध्येही मिळणार आहे. 1 जानेवारी पासून फिक्स आणि वायरलेस सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे. त्याला मिळणार प्रतिसाद पाहून पुढे आपल्या सेवेची व्याप्ती वाढवणार आहे. त्यामुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
सध्या मुंबई आणि दिल्ली या दोन्ही महानगरांमध्ये एमटीएनल टेलिफोन आणि इंटरनेट सेवा पुरवत आहे. मात्र आर्थिक चणचणीमुळे एमटीएनलचे बीएसएनएलमध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे एमटीएनलच्या उपलब्ध यंत्रणेचा आधार घेत बीएसएनएल येथे आपली सेवा सुरु करणार आहे. दरम्यान ट्रायच्या आकडेवारीनुसार टेलिफोन आणि इंटरनेट व्यवसायात बीएसएनएल आणि एमटीएनलचा हिस्सा 10.56 टक्के आहे, तर खासगी कंपन्यांचा 89.44 टक्के आहे. बीएसएनएलमध्ये 1.68 लाख कर्मचारी असून एमटीएनलमध्ये 22 हजार कर्मचारी असून दोन्ही कंपन्यांवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे.
4-जी सेवा सुरू करणार
बीएसएनएल प्रायोगिक तत्वावर मुंबई आणि दिल्लीत टेलिफोन आणि इंटरनेट सेवा देणार असून सर्वकाही सुरळीत सुरू झाल्यानंतर 4-जी सेवा सुरू करण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून प्रूफ ऑफ का@न्सेप्ट (पीओसी) घ्यावी लागणार आहे.
























































