
राजेश चुरी, मुंबई
विराट कंट्रोल रूम कॉलिंग…. मंत्री गेटवरून मर्सिडीजला आत सोडा… मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून वॉकीटॉकीवर मेसेज येतो… आलिशान गाडीची कोणतीही तपासणी न होता थेट प्रवेश मिळतो. काही वेळात ‘अर्जुन’ कंट्रोलवरून मंत्री गेटवर मेसेज येतो, गेटवर आलेल्या लँडक्रूझरला आत प्रवेश द्या… पुन्हा तपासणीविना आलिशान गाडी आत प्रवेश करते… आणि मग सुरक्षा व्यवस्थेचे सर्व नियम धाब्यावर बसवून येणारे बिल्डर, दलालांच्या आलिशान मोटारींचा मंत्रालयाला गराडा पडलेला दिसतो.
मंत्रालयात सर्वसामान्यांना अतिशय काटेकोरपणे तपासणी करून प्रवेश दिला जातो, पण व्हीआयपी नंबरच्या आलिशान मोटारीतून येणारे बिल्डर, दलालांना मात्र कोणत्याही तपासणीविना थेट प्रवेश मिळत असल्याचे खुलेआम दिसते. मंत्रालयाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून महत्त्वाच्या मंत्र्यांच्या दालनाला कोडवर्ड दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनाला ‘विराट’ असा कोडवर्ड आहे, तर नंबर दोनचे मंत्री असलेले राज्याचा महसूल सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांच्या दालनाला ‘रेनॉल्ट’ व अर्थव्यवस्था सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनाला ‘अर्जुन’ कोडवर्ड आहे.
यासारख्या मंत्र्यांच्या दालनातून अधिकाऱयाचा फोन आला की आलिशान गाडय़ांना थेट मंत्रालयात प्रवेश मिळत असल्याचे दिसते. सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश घेताना एंट्री पास काढावा लागतो. आधारकार्ड-पॅनकार्डचा पुरावा असल्याशिवाय पास वितरित होत नाही, पण बिल्डरांना केवळ वॉकीटॉकीच्या एका मेसेजवर आत प्रवेश मिळतो. मंत्रालयातल्या कामासाठी मर्सिडीज, ऑडी, लँडक्रूझर, जीप, रेंज रोव्हर, फोर्ड, फॉर्च्युनर अशा गाडय़ांमधून बिल्डरांपासून एजंट मंडळींची सध्या रीघ लागली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत या गाडय़ांचा मुक्काम मंत्रालयात असतो.
विराट-अर्जुन-रेनॉल्टचे फोन अधिक
मंत्री गेटवर उभे राहून पोलिसांच्या वॉकीटॉकीवरील मेसेज कानावर पडतात तेव्हा ‘विराट’, ‘अर्जुन’ व ‘रेनॉल्ट’च्या कार्यालयातून थेट प्रवेशासाठी अधिक प्रमाणात शिफारशी येत असल्याचे लक्षात येते. वरच्या मजल्यावरून मेसेज आल्यावर बिल्डरांच्या मोटारींची कोणतीही तपसाणी करण्याची पोलिसांची हिंमत होत नाही. बिल्डरांच्या आलिशान गाडय़ांच्या मागे अनेकदा त्यांच्या खासगी बॉडीगार्डच्या गाडय़ाही शिरतात. त्यांचीही तपासणी होत नाही. व्हीआयपी गेटच्या बाजूला मंत्र्यांच्या गाडय़ांचे पार्किंग आहे. याच पार्किंगमध्ये बिल्डरांच्या मोटारी पार्क होतात.
पार्किंग-ड्रॉपिंगचे पास
मंत्रालयात प्रवेशसाठी मोटारींना तांबडय़ा रंगाचे व पार्किंगसाठी जांभळय़ा रंगाचे स्टिकर दिले आहेत. पण बिल्डर-एजंटांच्या गाडय़ांना कोणतेही स्टिकर नसतात, पण तरीही मंत्र्यांच्या दालनातील शिफारशीवरून मोठय़ा टेचात या व्हीआयपी नंबरच्या गाडय़ा मंत्रालयात शिरून सुरक्षाव्यवस्था धाब्यावर बसवत आहेत. बिल्डरांच्या या गराडय़ाची मंत्रालयात आता खुलेआम चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील दालनाला ‘विराट’ असा कोडवर्ड आहे. नंबर दोनचे मंत्री असलेले राज्याचा महसूल सांभाळणारे चंद्रकांत पाटील यांच्या दालनाला ‘रेनॉल्ट’ कोडवर्ड आहे. अर्थव्यवस्था सांभाळणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनाला ‘अर्जुन’ कोडवर्ड आहे.
























































