
रेंजहिल्स भागात घरफोडी करून टी.व्ही, लॅपटॉपसह इतर मुद्देमाल चोरून पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत राहुल के. ( वय 34, रा. रेजहिंल्स) यांनी तक्रार दाखल केली आहे.
खडकीतील रेंजहिल्स भागात गुरुवारी तक्रारदाराच्या मित्राच्या घरात ही घटना घडली होती. बंद घराचा कडी – कोयंडा तोडून अल्पवयीन मुलाने घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील टी. व्ही, लॅपटॉप असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून अल्पवयीन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर 12 तासांच्या आत अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम, संतोष भांडवलकर यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.


























































