बुऱ्हानगर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित, नगर शहरासह तालुक्यातील दीड लाख नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहर व तालुक्यासाठी महत्त्वाची असलेली बुऱहानगर प्रादेशिक पाणी योजना थकीत वीज बिलामुळे बंद झाली आहे. चार कोटींचे वीज बिल थकल्याने ‘महावितरण’ने या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतच ही पाणी योजना बंद झाल्याने तपोवननगरसह तपोवन परिसरातील व तालुक्यातील 56 गावांतील दीड लाख नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे.

नगर शहराजवळील तपोवन रोडसह 56 गावे बुऱहानगर पाणी योजनेवर अवलंबून आहेत. त्यात नगर तालुका, पाथर्डी व राहुरी तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. महावितरणने चार कोटींचे वीज बिल थकल्याने या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे तपोवननगर व तपोवन परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे, पाणीपट्टीदेखील साडेसहा कोटींची थकली. त्यामुळे ही योजना आता अडचणीत सापडली आहे. पाणी योजनांवर अवलंबून असलेल्या दीड लाख नागरिकांना सध्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

योजनेचे पाच लाखांचे वीज बिल भरले

n बुऱहानगर पाणी योजना बंद झाल्याने अनेक गावे पाण्यापासून वंचित आहेत. बुऱहानगर ग्रामपंचायतीने शुक्रवारी पाच लाखांचे वीज बिल भरले असून, सोमवारपर्यंत आणखी 10 लाखांचे वीज बिल ही ग्रामपंचायत भरणार आहे. थकीत वीज बिल भरल्यानंतरच पाणी योजना सुरू होणार असली, तरी नागरिकांना मात्र ऐन उन्हाळ्यात भटकंती करावी लागणार आहे.

या गावांची साडेसहा कोटी पाणीपट्टी थकली

n नागरदेवळे, वडारवाडी, बाराबाबळी, बुऱहानगर, खारेकर्जुने, खातगाव, जेऊर, कापूरवाडी व केतकी शहापूर या गावांची पाणीपट्टी मोठय़ा प्रमाणात थकीत आहे. त्यामुळे बुऱहानगर पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात
आला आहे.

मीटरप्रमाणे पाणी असूनही पाण्यासाठी दाहीदिशा

n नगर शहराजवळ झपाटय़ाने विकसित होत असलेल्या तपोवन रोड परिसरात नागरिकांना गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळत नाही. मीटरप्रमाणे पाणी असतानाही नागरिक मीटरप्रमाणे पाणी घेतात, तरीदेखील पाणी मिळत नसल्याने टँकरद्वारे विकतचे पाणी घेऊन नागरिकांना तहान भागवावी लागत आहे, याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.