नवऱ्याला स्त्रीलंपट म्हणणे ही क्रूरताच; दिल्ली हायकोर्टाचा घटस्फोटाला स्थगिती देण्यास नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पतीचा सातत्याने अपमान करणे तसेच आपल्या कार्यालयात आणि नातेवाईकांना पतीबद्दल सांगून त्याची स्त्रीलंपट अशी प्रतिमा उभी करणे ही क्रूरताच असल्याचे दिल्ली हायकोर्टाने एका जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणावर निर्णय देताना म्हटले आहे. कौटुंबिक न्यायालयाने  या जोडप्याला दिलेल्या घटस्फोटाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बंसल कृष्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पत्नीने पतीवर केलेले आरोप सार्वजनिक स्वरुपात त्याची प्रतिमा बिघडवण्याचे काम करतात, हे अत्याधिक क्रौर्यच असू शकते, अशी टीपण्णीही हायकोर्टाने केली. विश्वास आणि सन्मान हे कुठल्याही विवाहाचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत.  या प्रकरणात पत्नीचा पतीवर कमी विश्वास असल्याचे दिसून येत असल्याकडेही हायकोर्टाने लक्ष वेधले.

काय म्हणाले हायकोर्ट…

जोडीदाराकडून सन्मानाची अपेक्षा असते.  मात्र दुर्दैवाने या ठिकाणी असे दिसत नाही.  कार्यालयात तसेच नातेवाईकांसमोर पतीवर स्त्रीलंपट आणि धोका देणारा असे संबोधून त्याचा अपमान केला गेला. पतीची स्त्रीलंपट अशी प्रतिमा उभी करण्यात पत्नीने कुठलीही कसर बाकी ठेवलेली नाही. हे  क्रौर्य असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.   या प्रकरणात अर्धे सत्य, अर्धे खोटे, कमी सन्मान आणि कमी विश्वास दिसत असून या आधारावर लग्न टिकू शकत नाही, अशी टिपण्णी उच्च न्यायालयाने केली.  अपत्यालाही पित्यापासून वेगळे ठेवण्यात आले तसेच त्याचा वापर पतीविरोधात शस्त्र म्हणून केला गेला. सहा वर्षे हे जोडपे एकत्र राहिले. यादरम्यान पतीला मिळालेली वागणूक क्रौर्य सिद्ध करते. त्याच्या मनात आत्महत्येचे विचारही आले, याकडेही हायकोर्टाने लक्ष वेधले.