
गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालय व राज्याचा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयातील समिती कक्षात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्रातील अवयव दान चळवळीला गती देण्यासाठी गरीब व गरजू रुग्णाला अवयव प्रत्यारोपणाच्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधी पेक्षा अधिकचा खर्च लागल्यास कॉर्पस फंडामधून निधी उपलब्ध करून देऊन अवयव प्रत्यरोपण मोहीम गतिमान करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिले.
पश्चिम महाराष्ट्र, सीमावर्ती गोवा व कर्नाटक भाग आणि गारगोटी तालुका व परिसरातील ग्रामीण भागातील रुग्णांना सीटी स्कॅन, एक्स रे, ईसीजी, टू डी इको आदी महागड्या चाचण्या साठी पुणे, मुंबईसारख्या शहराकडे जावे लागू नये यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रोटॉन थेरपी सुरू होणार
प्रोटॉन थेरपीसारखे महागडे उपचार महाराष्ट्रात फक्त मुंबई येथेच असून, त्यामुळे बरेचशे कर्करोगाचे रुग्ण यापासून वंचित राहतात त्यासाठी रुबी हॉल क्लिनिक येथे प्रोटॉन थेरपीसारखी अत्याधुनिक सुविधा अगदी कमी खर्चात चालू करणेबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला रुबी हॉल रुग्णालयाच्या वतीने विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. सायमन ग्रँट, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मुदित सक्सेना, रुबी जनरल मॅनेजर सचिन दंडवते आदी उपस्थित होते.

























































