‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ : अनुपम खेरसह 13 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारीत ‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सुरू झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. आता या वादग्रस्त चित्रपटाप्रकरणी बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयाने अभिनेते अनुपम खेर यांच्यासह 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर कांटी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात येईल.

‘द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसने मोठा आकांडतांडव सुरू केला आहे. या चित्रपटाविरोधात अधिवक्ता सुधीर ओझा यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. चित्रपटाद्वारे मनमोहन सिंग यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची तसेच देशाची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली. न्यायालयाने यावर सुनावणी घेताना चित्रपटात मनमोहन सिंग यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनुपम खेर यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

दिल्लीत उद्या सुनावणी

दरम्यान याच चित्रपटाविरोधात पुजा महाजन यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित होणार असून यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

याआधी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी उत्सुकता असल्याचे दिसले. परंतु काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर युट्युबवरून गायब झाल्याचा आरोप अभिनेते अनुपम खेर यांनी केला. देशातील काही भागात हा व्हिडीओ तर दिसत नसल्याचे समोर आले. चित्रपटात मुख्य भूमिका निभावणारे अभिनेते अनुपम खेर यांनी स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली होती.