
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत गर्दी जमवून ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात आरतीसह घंटानाद केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपच्या काही पुण्यातील नगरसेवकांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कसबा मतदार संघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, स्वरदा बापट, राजेंद्र मानकर, गणेश बीडकर, राजेश पांडे, दिपक पोटे, राजेंद्र मानकर, राजेश येनपुरे, हेमंत रासणे, संजय देशमुख, बापु नाईक, निलेश कदम, राजेश परदेशी, पुनीत जोशी अशा 16 पदाधिकार्यांवर 188 तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रविंद्र दहातोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यासह कार्यकर्त्यांनी कोरोना नियमावलीचे उल्लंघन करीत कसबा गणपती मंदिरात आरतीसह घंटानाद केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आंदोलनाला परवानगी नसताना भाजपने नियमांचे उल्लंघन करीत गर्दी जमवली होती. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन आणि कोरोना कालावधीत गर्दी जमविल्याबाबत संबंधित भाजपच्या प्रदेशाध्यक्षसह पुण्याचे महापौर आणि काही नगरसेवक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना संसंर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिका आयुक्तांनी ब्रेक द चेन च्या अनुषंगाने अत्यावश्यक कारणाशिवाय आंदोलनाला बंदी घातली आहे. दरम्यान भाजप पदाधिकार्यांनी विना परवानगी घंटानाद आणि घोषणाबाजी करत कसबा गणपती मंदिराच्या मुख्य दरवाजातून मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजाऊन सांगितले. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात मंदिरे खुले करण्याबाबत घोषणाबाजी केली होती. महाराष्ट्र शासनाचे व पालिका आयुक्तांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना भाजप पदाधिकार्यांनी आदेशाचे उल्लंघन करून जाणूनबुजून जीवीतास धोका निर्माण करण्याचे कृत्य केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
























































