ईडी-सीबीआय प्रमुखांचा कार्यकाळ 2 वर्षांवरून 5 वर्षांपर्यंत वाढवला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation) अर्थात सीबीआय प्रमुखांच्या कार्यकाळात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ईडी आणि सीबीआय प्रमुखांचा कार्यकाळ तीन वर्षांनी वाढवण्यात आला आहे.

ईडी आणि सीबीआय प्रमुखाचा कार्यकाळ आता पाच वर्षांचा असणार आहे. याबाबत केंद्र सरकारने एक अध्यादेश जारी केली आहे. याआधी ईडी आणि सीबीआय प्रमुखांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा होता, मात्र मोदी सरकारने यात तीन वर्षांची वाढ केली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्राने हा अध्यादेश आणला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही यावर मोहोर उमटवली आहे. आता 29 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनावेळी सरकार हा अध्यादेश संसदेमध्ये सादर करेल.

नव्या अध्यादेशानंतर ईडी आणि सीबीआय प्रमुखांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांसाठी करण्यात येईल. यानंतर तीन वर्षांचा एक्सटेंशन देण्यात येईल. प्रत्येक वर्षी एक-एक वर्षांचा एक्सटेंशन देण्यात येईल. मात्र ईडी आणि सीबीआय प्रमुखांना पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पदावर राहता येणार नाही.

सध्या सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल तर ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा हे आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मिश्रा यांचा कार्यकाळ सरकारने एक वर्षांसाठी वाढवला होता.