
मध्य रेल्वे मार्गावर फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतेच आहे. गेल्या पाच महिन्यांत तब्बल 18.03 लाख विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून 140.81 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दररोज सरासरी 11 हजारांपेक्षा अधिक जणांवर दंडात्मक कारवाई आणि 92.03 लाख रुपयांची वसुली केली जात असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.
एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान मध्य रेल्वेच्या समर्पित तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट किंवा अयोग्य/अवैध प्रवास करणाऱया 18.03 लाख प्रवाशांना पकडले. गेल्या वर्षी याच कालावधीत 17.19 लाख प्रकरणे आणि 100.50 कोटी रुपयांचा दंड नोंदवण्यात आला होता. त्या तुलनेत या वर्षी प्रकरणांच्या संख्येत जवळपास 5 टक्के आणि उत्पन्नात 40 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये विनातिकीट किंवा अवैध तिकीट घेऊन प्रवास करणाऱया 2.57 लाख प्रवाशांना पकडण्यात आले आणि 19.50 कोटींचा दंड वसूल केला. ऑगस्ट 2025मध्ये ही संख्या 2.76 लाख इतकी होती, तर 13.78 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. यंदा दंड वसुलीच्या रकमेत 41 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.
विभागनिहाय दंड वसुली
मुंबई – 58.46 कोटी रुपये
भुसावळ – 35.52 कोटी रुपये
पुणे – 16.29 कोटी रुपये
नागपूर – 15.83 कोटी रुपये
सोलापूर – 6.13 कोटी रुपये
मुख्यालय – 8.57 कोटी रुपये






























































