
सामना ऑनलाईन । मुंबई
गेले तीन दिवस मुंबईमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना उडालेली असतानाच मध्य रेल्वेने हजारो प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचे समोर आले आहे. हार्बर रेल्वेच्या मानखुर्द व गोवंडी स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेले होते. त्यानंतर रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्याऐवजी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर चिंध्या बांधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तडा गेलेल्या रेल्वे रुळावरून चक्क तीन रेल्वे धावल्या मात्र प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. मध्य रेल्वेच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
मंगळवारी संध्याकाळी रेल्वे रुळाला तडे गेल्याचे समोर आले होते. मात्र या तड्यांवर तातडीने दुरुस्ती करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाच्य अधिकाऱ्यांनी चक्क फडका बांधलेला होता. एबीपी माझा या वृत्त वाहिनीने याबाबत वृत्त दिल्यानंतर प्रशासन जागे झाले व त्यांनी रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर जवळपास एक ते दीड तास हार्बर रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. आधीच पावसामुळे हैरान झालेल्या नोकरदारांचे त्यामुळे आणखीनच हाल झाले.
























































