
चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील वर्धा- वैनगंगा – उमा नद्यांनी पात्र सोडले आहे. इरई नदीत पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पुराचे संकट चिमूर शहराच्या आसपास केंद्रित झाले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीला पूर आल्याने चिमूर शहरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे शहरातील उप जिल्हा रुग्णालयही पुराच्या पाण्यात आहे, टेलिफोन एक्सचेंज- तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूरला सध्या बेटाचे स्वरूप आले आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा तसेच चिमूर – नेरी मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. प्रशासन पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सक्रिय झाले आहे.




























































