
शेतातील पीक संरक्षणासाठी तरुण शेतकऱ्याने शेताभोवती लाकडी कुंपण केले होते. त्याच कुंपनात पाय पाय अडकल्याने एक तरुण शेतकरी विहीरीत पडला व त्याचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रूपरमधील गोंडपिपरी तालुक्यातील चेकपिपरी येथे घडली आहे. सोमनाथ शुकनाथ ईस्टाम असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या चेकपिपरी येथील तरुण शेतकरी सोमनाथ शुकनाथ ईस्टाम यांच्या शेतात तुरीचे पीक घेतले होते. तूर पिकाची कापणी झाली. आज तुरीची मळई करावयाची होती. त्यासाठी कुंपण काढत असताना पाय कुंपनात अडकला व सोमनाथ कुंपणासहित विहिरीत पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती गोंडपिपरी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार जीवन राजगुरू, मोगरे यांनी घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा केला. सोमनाथ यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. गोंडपीपरी पोलीस याचा तपास करीत आहेत. सोमनाथ हा अल्पभूदारक शेतकरी होता. त्याच्या पश्चात पत्नी व तीन मुली आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
































































