वन्य जिवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी निर्णय

चंद्रपूर जिह्यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कन्हारगाव हे राज्यातील 50 वे अभयारण्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत कन्हारगाव अभयारण्य घोषित करण्यास मान्यता देण्यात आली होती.

व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित होण्यासाठी आणि वनसंपदेचे जतन व संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानिमित्ताने म्हटले आहे. विदर्भ ही देशाची व्याघ्र राजधानी मानली जाते. वाघांचे सुरक्षित स्थलांतर होणे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास जपणे याला शासनाने नेहमीच प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले. याच भूमिकेतून कोल्हापूर ते कर्नाटकपर्यंतचा वन्य जिवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित करण्यासाठी पश्चिम घाटात आठ तर विदर्भात दोन अशा दहा संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणाही शासनाने याच बैठकीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वाघाचे भ्रमणमार्ग होणार सुरक्षित

269 चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हारगाव अभयारण्य असणार आहे. कन्हारगाव अभयारण्य हे चंद्रपूर जिह्यातील प्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या दक्षिणेकडील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱया व्याघ्र भ्रमणमार्गाच्या महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड राज्याच्या सीमेला जोडणारा तसेच या राज्याच्या वनक्षेत्रास सलग असलेले वनक्षेत्र आहे. कन्हारगाव अभयारण्याच्या पश्चिमेकडे यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्य असा भ्रमणमार्ग आहे, तर तेलंगणा राज्यातील कावल अभयारण्य असा भ्रमणमार्गसुद्धा आहे. कन्हारगावच्या दक्षिणेकडील छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प असासुद्धा महत्त्वपूर्ण भ्रमणमार्ग आहे.

आश्रयस्थळे सुरक्षित

चंद्रपूर जिह्यातील मानव-वन्य जीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आश्रयस्थळे सुरक्षित ठेवणे गरजेचे होते आणि त्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा निर्णय ठरेल. कन्हारगाव अभयारण्य घोषित झाल्याने 2013 पासूनची पर्यावरणप्रेमींची मागणी पूर्ण झाली आहे. अभयारण्याच्या घोषणेनंतर या भागाचा विकास अधिक वेगाने होईल तसेच वन व वन्य जिवांना राजाश्रय मिळेल असा आशावाद स्थानिक वन्य जीवप्रेमींनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या