आला थंडीचा महिना..! चंद्रपुरातील बेरोजगार तरुण उतरले व्यवसायात, मसाला दुधासाठी लागल्या रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या व्यवसायाला घरघर लागली. काहींची नोकरी गेली, तर काहींचे व्यवसाय गेले. त्यामुळे आता कोरोनानंतर मोठ्या संख्येने तरुण व्यवसायात उतरल्याचे दिसते. त्यात थंडी सुरू झाल्याने गुणकारी मसाला दुधाच्या गाड्या चंद्रपुरात दिसू लागल्या आहेत. चवीला गोड आणि आरोग्यासाठी गुणकारी असणाऱ्या या मसाला दुधाची मागणी वाढत असून तरुणांना यातून रोजगारही मिळत आहे.

चंद्रपूर शहरात ठिकठिकाणी मसाला दूधविक्रेते मोठ्या संख्येने दिसत आहेत. जटपुरा गेट, गांधी चौक, वरोरा नाका, तुकूम तसेच जनता कॉलेज चौकातील गरमागरम दुधाच्या कढयांमधून दूध विकण्यात येत असून, ते नागरिकांच्या पसंतीस उतरत आहे. थंडी वाढल्यामुळे संध्याकाळ पासून रात्री उशिरापर्यंत गरम दूध पिण्यास अनेक जण प्राधान्य देत आहेत.

चव अन् दुधाच्या वेगवेगळ्या प्रकारांमुळे ग्राहकांची मोठी पसंती मिळत आहे. गरम दुधात केशर, जायफळ, इलायची, बदाम आदी टाकले जाते. मसाले टाकल्यामुळे ते चवीला छान लागते. याशिवाय, गरम दुधात हळद टाकल्याने घसा व खोकल्यासाठी ते गुणकारी ठरते. त्यामुळे दूध पिण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी होताना दिसत आहे.

30 रुपयांना एक ग्लास

शहरातील विविध चौकांमध्ये कढईतील मसाला दुधाला मागणी वाढली आहे. दरम्यान, 30 रुपयांला एक ग्लास दूध मिळत आहे. विशेष‍ म्हणजे काहींनी पार्सलची सुविधाही सुरू केली आहे. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांकडून मागणी वाढत आहे.