चंद्रपूर – 24 तासांपासून आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान 43.6 अंश होते. अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन सुरू केलं. जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात हे रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन 24 तासांपासून सुरू आहे.

50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सेटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासींनी हे आंदोलन सुरू केलं आहे.

मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारची अख्खी रात्र आंदोलनकर्त्यांनी जागून काढली असून बुधवारी पहाटेपासून आंदोलनाला परत सुरुवात झाली आहे. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील आदिवासी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.