संभाजीनगर, धाराशीव नामांतराचा आज पुन्हा निर्णय, नवे सरकार ताळ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा घेतलेला निर्णय पुन्हा नव्याने शिंदे-फडणवीस सरकारकडून घेतला जाणार आहे. महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याचे वृत्त पसरताच ठिकठिकाणाहून उठलेल्या संतप्त प्रतिक्रियांमुळे आज अखेर शिंदे-फडणवीस सरकारला तातडीने उद्याच्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय आणणे भाग पडले असून उद्याच्या बैठकीत हा निर्णय घेतला जाणार आहे.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा निर्णय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या निर्णयाचे सर्वच स्तरांतून स्वागत झाले. मात्र श्रेयवादापोटी हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे सांगून हा निर्णय आम्ही पुन्हा घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाला स्थगिती दिल्याचे वृत्त पसरताच सर्वच स्तरांतून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होऊ लागली. अखेर सायंकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात तर एकनाथ शिंदे यांनी एका सभेदरम्यान उद्या होणाऱया मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगर, धाराशीव तसेच नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नामकरण करण्याचा निर्णय घेतला जाईल असे जाहीर केले. हा आमच्याही अस्मितेचाच भाग असल्याने आमचे पूर्ण बहुमतातील सरकार योग्य प्रक्रियेने हा निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. नामांतर हा आमच्याही अस्मितेचा भाग आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्तांना तसा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही दिले आहेत. आमचे पूर्ण बहुमत असलेले सरकार हा निर्णय घेईल, असेही फडणवीस म्हणाले.

 लवकरच मंत्रिमंडळ विस्तार

आमच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करण्याचा विरोधकांना अधिकारच नाही. यांचे सरकारदेखील स्थापन झाले होते तेव्हा सव्वा महिना पाचच मंत्री होते. यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुठे फिरकायचेही नाहीत. आम्ही दोघेच असून सगळीकडे जात आहोत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा झाली असून लवकरच विस्तार होईल, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.