तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर सरकारी कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱयांशी ओळख आहे. मी तुमचे काम करून देतो, असे सांगत शहरातील अनेक महिलांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महादेव किसन डाडर (रा. पाटेवाडी, ता. कर्जत) या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शोभा संजय शिंदे (रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी महादेव डाडर हा एप्रिल 2024 मध्ये शोभा शिंदे यांच्या वडिलांच्या मित्रासोबत त्यांच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने आपली तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱयांशी ओळख आहे. तुमचे काही काम असेल तर सांगा, मी ते करून देतो, असे सांगितले होते. त्यावेळी त्यास आपल्या सासऱयांचे सातबारा उताऱयावर नाव लावायचे आहे, असे सांगितले. यासाठी त्याने 30 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी डाडर याने फिर्यादीचा भाऊ संघराज माखले याच्याकडून 15 हजार रुपये घेतले. त्यानंतर मे महिन्यात डाडर फिर्यादीच्या घरी आला व ‘तुमचे काम झाले आहे. साहेबांनी ऑर्डर काढली असून, उरलेले 15 हजार रुपये द्या,’ असे सांगितले. तेव्हा त्याला 11 हजार रुपये दिले. त्यानंतर अनेक दिवस झाले तरी ऑर्डर न आल्याने त्यास फोन केला असताना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पैसे परत मागितल्यावर 10 हजार रुपये पाठविले, तर उर्वरित 20 हजार रुपये परत न देता फसवणूक केली.
याबाबत फिर्यादी शिंदे कोतवाली पोलीस ठाण्यात आल्या असता, डाडर याने रेल्वे स्टेशन, आगरकर मळा परिसरातील 14 महिलांची फसवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोभा शिंदे यांच्या फिर्यादीवरून महादेव किसन डाडर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.