मनुवाद गाडा अन्यथा देशाचे तुकडे – भुजबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

विकास दिसत नसल्याने निवडणुकांच्या तोंडावर दंगे भडकवून विजय साकार केले जात आहे. आताच मनुवाद गाढला गेला नाही तर पुन्हा जुने दिवस येतील, विचार स्वातंत्र्य नष्ट होईल, एकसंघ देशाचे तुकडेसुद्धा होतील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला. सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही विषयावर खडा फेकून बघितला जातो. ते पचले तर पुढे जातात, विरोध झाल्यास हात काढून घेतात. पण, कडवा विरोध दर्शविला जात नाही. मुह में राम, बगल में छुरी अशी दृटप्पी भूमिका आहे. समाजविरोधी कृत्यांना कडवा विरोध असल्याचे ठामपणे सांगा, अशी वृत्ती ठेचून काढण्याची ग्वाही द्या असे आव्हान त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या संविधान बचाओ, देश बचाओ मोहिमेंतर्गत मंगळवारी वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसने शक्तीप्रदर्शन करीत एकप्रकारे विदर्भात लोकसभा निवडणुकीचे बिगूल फुंकले. ज्येष्ठनेते छगन भुजबळ, राकॉंचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, राकॉं महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार विद्या चव्हाण, सुमन पाटील, दिपिका चव्हाण, ज्योती कलानी, वसुधा देशमुख, आ. प्रकाश गजभिये, हेमंत टकले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

लोकशाही व्यवस्थेला भाजपाचे नख – अजित पवार

‘स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षे स्वत:च्या प्राणापेक्षाही अधिक श्रद्धेने जपली त्या लोकशाही व्यवस्थेला भाजप नखं लावित आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

‘संभाजी भिडे गुरुजी अंधश्रद्धा पसरवित आहेत. ९७ टक्के लोकांना शुद्र ठरविणाऱ्या मनुला भिडे श्रेष्ठ ठरवितात. भिडेंच्या बोलण्यामागील मास्टर माईंड कोण असा प्रश्‍न अजित पवार यांनी उपस्थित केला. ‘समाजात दुही माजवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न भाजपाने चालविला आहे. आभाळ फाटले तरी संविधान बचावाची लढाई लढू आणि जिंकू देखील. राज्यघटनेला धक्का लावणाऱ्यांचे हात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कलम करील. निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.