
लातुर तालुक्यातील तांदुळजा येथे पंचक्रोशीतील कमीत कमी दहा ते बारा गावांचा संपर्क असलेली फार मोठी बाजारपेठ आहे. मात्र व्यावसायिकांचे अतिक्रमण, बेशिस्तप्रकारे लावण्यात येणारी वाहने, अवैध वाहतूक आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडींने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकदा पोलिसात ग्रामपंचायतीमार्फत अर्ज करुनही त्यावर काहीच कारवाई केली जात नाही.
या बाजारपेठेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, तसेच दोन-तीन पतसंस्था, चार गावच्या सोसायटीचे कार्यालय , मांजरा सहकारी साखर कारखाना ,विकास सहकारी साखर ,कारखाना ट्वेंटी-ट्वेंटी सहकारी साखर कारखाना, नॅचरल शुगर, कारखान्याचे कार्यालय , सोयाबीन खरेदी विक्री केंद्र तांदुळजा येथेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बारा गावच्या लोकांचा मोठा जनसंपर्क आहे तसेच चार कारखान्याची रहदारी आहे चारही रोडवर मोठ्या प्रमाणात अवैद्य वाहतूक केली जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चारीही रोडवर अतिक्रमण केल्यामुळे वाहनांची जाण्या येण्याची कोंडी होत आहे भर रोडवर लोक वाहने उभा करून आपापल्या कामाला जात आहेत. तसेच छोटे छोटे व्यावसायिक मोबाईल कंपनीचे सिम कार्ड विकणारे आपापल्या छत्र्या भर रोडवर लावून अतिक्रमणात भर पाडत आहेत. या सर्व अतिक्रमण व अवैद्य वाहतुकीमुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा श्वास गुदमरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वेळोवेळी मुरुड पोलीस स्टेशनला ग्रामपंचायत मार्फत अर्जही देण्यात आले आहेत.
दहा बारा गावातील नागरीक कार्यालयीन कामासाठी व गरजा भागविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी साठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात ,पण यावेळी वाहनांची बेशिस्त पार्किंग रस्त्यावरच करताना दिसून येतात. भाजीपाला विकणारे विक्रेते तर भर रस्त्यावरच आपले दुकाने थाटतात. भाजीपाला खरेदी करण्यासाठी थांबलेले ग्राहक आपल्या गाड्या भर रस्त्यावर लावुन इतरत्र फिरताना दिसून येतात. त्यामुळे शिवाजी महाराज चौकात लहान मोठे अपघात होण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या असून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु असते. आता कारखाने चालू झाल्यामुळे ऊस वहातुक करणारे ट्रॅक्टर, ट्रक ड्रायवर मोठ्या आवाजात गाणे वाजवत वाहने रस्त्यावरच उभे करतात. यामुळे मोठया प्रमाणात वाहतुक कोंडी होत असुन जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अवैध वाहतुक करणाऱ्या काळी पिवळी जीप, ऑटो रिक्षा यांनाही पोलिसांच्या आशिर्वादाने वाहने चौकात उभी करण्याची मुभा मिळाली आहे अशी नागरिकांतून चर्चा आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, तरी संबधित प्रशासन व पोलीस प्रशाशनाने कारवाई करुन वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सोडवणूक करावी अशी मागणी होत आहे.
























































