चिखलीकर लाच प्रकरणातील मूळ तक्रार न्यायालयातून गहाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नाशिक

सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर लाच प्रकरणातील फिर्यादीची मूळ तक्रार न्यायालयातील आरोपपत्रातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना रस्त्याच्या कामाचा ३ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून चिखलीकर याने बावीस हजार रुपयांची लाच मागितली होती. शाखा अभियंता जगदीश वाघ याच्यामार्फत ही लाच स्वीकारताना ३० एप्रिल २०१३ रोजी चिखलीकर व वाघ या दोघांना लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली होती. यानंतरच्या चौकशीत चिखलीकर व त्याच्या पत्नीच्या नावे त्याच्या नोकरीच्या १ सप्टेंबर १९८९ ते ३० एप्रिल २०१३ या कालावधीत सुमारे चौदा कोटी रुपयांची मालमत्ता आढळून आली होती. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व इतर मालमत्तेचा यात समावेश होता. स्पेशल केस नंबर ३८/२०१५ अन्वये २६ नोव्हेंबर २०१५ रोजी नाशिक न्यायालयात सतीश चिखलीकरविरुद्ध दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. जून महिन्यात यातील फिर्यादीची मूळ तक्रारच गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. मूळ तक्रारीऐवजी कुणाच्याही स्वाक्षऱ्या नसलेली तक्रारीची झेरॉक्स प्रत या प्रकरणाला जोडल्याचे आढळले. विशेष सरकारी वकील ऍड. अजय मिसर यांच्या सूचनेनुसार हा खटला आता दुसऱ्या न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार गहाळ झाल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.