चीन, पाकिस्तानशी युद्ध कधी करायचे हे मोदी यांनी निश्चित केलेय! भाजप युपी प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीन आणि पाकिस्तानशी युद्ध कधी करायचे, याच्या तारखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केल्या आहेत. योग्य वेळी पंतप्रधान त्याबाबत घोषणा करतील, असे वक्तव्य करीत भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वातंत्रदेव सिंह यांनी मोठी खळबळ उडवून दिली आहे.

एलएसीवर विजयादशमीच्या शस्त्रपूजनाप्रसंगी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानला सीमेवरील तणाव संपवायचा आहे, असे स्पष्ट केलेले असताना स्वातंत्रदेव यांच्या ‘संबंधित तिथी तय है’ या युद्धाविषयीच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) हिंदुस्थान आणि चिनी सेना मोठय़ा संख्येत एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. दोन्ही पक्ष सीमेवरील तणाव दूर करण्यासाठी चर्चेच्या मार्गाला प्राधान्य देत आहेत. या पार्श्वभूमीवर युद्धाबाबतच्या तारखांचे वक्तव्य भाजपच्या एका जबाबदार नेत्याने केल्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या राम मंदिर उभारणी आणि जम्मू-कश्मीरातील 370 कलम रद्द करण्याच्या धाडशी निर्णयाची आठवण आपल्या भाषणात करून दिली. ते म्हणाले, वेळ येईल तेव्हा पंतप्रधान युद्धाच्या तारखा जाहीर करतील. सिंह भाजप आमदार संजय सिंह यांच्या व्हिडीओ प्रकाशन सोहोळ्यात बोलत होते.

भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वातंत्रदेव सिंह युद्धाच्या घोषणेबाबत कसे जाहीर बोलतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, स्वातंत्रदेव यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याच्या उद्देशाने तसे वक्तव्य केल्याचे स्पष्टीकरण स्थानिक भाजप आमदार रवींद्र कुशवाह यांनी केले.

मात्र हिंदुस्थानचे केंद्रीय नेतृत्व शक्यतो शेजारी राष्ट्रांशी युद्ध टाळण्याची भूमिका घेत असताना एका स्थानिक भाजप नेत्याने युद्धाबाबत जाहीर वक्तव्य करणे योग्य नाही, असे परखड मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.