
परराष्ट्र संबंध अधिक भक्कम असल्याचा दावा करणाऱ्या मोदी सरकारचे मोठे अपयश चव्हाट्यावर आले आहे. हिंदुस्थानला अल्पावधीतच दोन देशांकडून धक्के बसले आहेत. एकीकडे जपानने हिंदुस्थानकडून उत्तम प्रतीच्या तांदळाच्या आयातीवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ चीनने तब्बल 70 वेळा हिंदुस्थानच्या बासमती तांदळाची निर्यात धुडकावल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त चीनने तीन हिंदुस्थानी निर्यातदारांचे आयात परवाने रद्द केले आहेत.
हिंदुस्थानातील बासमती तांदळाच्या साठ्यात जनुकीय सुधारित जीव (जीएमओ) आढळल्याचा दावा चीनने केला आहे. तथापि, हिंदुस्थानने चीनचा दावा अमान्य केला आहे. कापूस वगळता देशात कोणत्याही जनुकीय सुधारित पिकाची व्यावसायिक लागवड केली जात नाही, असे हिंदुस्थानने म्हटले आहे. चीनने सध्या जनुकीय सुधारित तांदळाचे कारण देत हिंदुस्थानी माल परत पाठवण्याचे सत्र सुरु ठेवले आहे.
गेल्याच आठवड्यात चीनने जनुकीय सुधारित जीवाचे अंश असल्याचा दावा करत हिंदुस्थानी तांदळाच्या चार ते पाच खेप परत पाठवल्या. यापूर्वी मार्च आणि एप्रिलमध्ये अनेक हिंदुस्थानी कंपन्यांकडून आलेला माल परत पाठवण्यात आला होता. त्याचबरोबर चीनने तीन हिंदुस्थानी निर्यातदारांचे आयात परवाने रद्द केले आहेत. चीनची ही खेळी व्यापारविषयक दबाव आणण्याचा प्रयत्न आहे की यामागे वेगळी रणनीती आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.




























































