चिपळूणच्या सुपूत्राचा दुबईत झेंडा, दुबई सरकारचा सर्वोच्च कंपनीचा पुरस्कार देऊन गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या सुपूत्राने दुबईत मराठीचा झेंडा फडकावला आहे. पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेल्या वसंतराव लाड यांच्या बी.एल.एस. ऑडिट फर्मला दुबई सरकारने सर्वोच्च फर्मचा पुरस्कार देऊन गौरव केला. एकूण 14 नामवंत कंपन्यांमधून चिपळूणच्या सुपूत्राच्या कंपनीची निवड झाली आहे.

चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वसंतराव लाड मुंबईला गेले आणि त्यानंतर दुबईमध्ये त्यांनी बी.एल.एस. ऑडिट फर्म सुरु केली. गेल्या 40 वर्षात चार्टर्ड अकाऊंटींगच्या क्षेत्रात वसंतराव लाड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

अफगाणिस्तानसारख्या देशामध्ये त्यांनी ऑडिटची सेवा पुरवली. लाड यांच्या कंपनीची कामगिरी पाहून दुबई सरकारने त्यांना सर्वोच्च कंपनीचा पुरस्कार प्रदान केला. चिपळूणच्या या मराठी सुपूत्राने दुबईत आपला झेंडा फडकावला आहे. त्यांच्या कामगिरी बद्दल चिपळूणसह कोकणातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अजूनही गावाशी नाळ जोडलेलीच

वसंतराव लाड यांनी दुबईमध्ये स्वतःचा व्यवसाय सुरु केला असला तरी आपले मूळ गाव असलेल्या अलोरेशी त्यांची नाळ जोडलेली आहे. अलोरे गावात अनेक शैक्षणिक आणि सामाजिक कामासाठी ते मदत करतात. विधवा महिला, निराधार व्यक्तींना वसंतराव लाड मदत करतात. वसंतराव लाड यांच्या नावाने अलोरेत एक कनिष्ठ महाविद्यालयही सुरु आहे.