‘क्लेफ्ट’ आजाराच्या जनजागृतीची गरज, स्मितहास्य पसरवण्यासाठी ‘मुस्कान’ची मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

8 फेब्रुवारीला नुकताच ‘क्लेफ्ट’ नॅशनल डे साजरा झाला; परंतु अनेकांना क्लेफ्ट म्हणजे काय आहे, हेच माहीत नव्हते. त्यामुळे अनेकांना हा दिवस साजरा करता आला नाही. देशात दरवर्षी 35 हजार मुलांना जन्मतः क्लेफ्ट हा आजार होतो, परंतु बाळाच्या जन्मानंतर हजारो पालक या आजाराबद्दल अनभिज्ञ असल्याने ते मुलांवर योग्य उपचार करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांच्या चेहऱयावरचे हास्य कधीच फुलत नाही. अशा मुलांच्या चेहऱयावर हास्य फुलवण्यासाठी ‘एक नयी मुस्कान’ ही मोहीम सुरू करण्यात आली.

हिमालया वेलनेस कंपनीने स्माईल ट्रेन या जगातील क्लेफ्टवर लक्ष देणाऱया सर्वात मोठय़ा सामाजिक संस्थेबरोबर पार्टनरशिप केली आहे. या संस्थेमार्फत जन्मजात दुभंगलेल्या टाळू आणि ओठांवर 100 टक्के मोफत शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, परंतु क्लेफ्ट (Cleft) या आजाराबद्दल देशातील हजारो पालक अनभिज्ञ आहेत. जनजागृती केली तरच अशा मुलांवर उपचार करणे शक्य होईल. स्मितहास्य हे आनंदाचे प्रतीक आहे. ‘एक नयी मुस्कान’च्या माध्यमातून मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सहकार्य करत आहोत, असे हिमालया वेलनेस पंपनीचे बिझनेस संचालक रमेश कृष्णमूर्ती या वेळी म्हणाले, तर मुलांच्या आरोग्यामध्ये आपले भविष्य दडलेले आहे. त्यांच्या खऱया आनंदापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही, असे माजी क्रिकेटपटू युवराज सिंग या वेळी म्हणाला.

क्लेफ्ट म्हणजे काय?
क्लेफ्ट म्हणजे बाळ जन्मतःच त्याचा डावा वरचा ओठ फाटलेला असतो. तसेच टाळू दुभंगलेली असते. यामुळे बाळाला व्यवस्थित स्तनपान करता येत नाही. त्याचे वजन कमी होते. त्यामुळे ते कुपोषित होते. त्याला नीट बोलता येत नाही, परंतु योग्य वेळी अशा मुलांवर उपचार केल्यास ते सर्वसामान्य मुलांप्रमाणे आयुष्य जगू शकतात.

वेळेत उपचाराची गरज
क्लेफ्टबद्दल जनजागृती करण्याची खरी गरज आहे. मी आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक मुलांवर शस्त्रक्रिया केली आहे. मुलांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, असे डॉ. भारती खांडेकर यांनी ‘सामना’शी बोलताना सांगितले.

कल्याणमधील मंथन म्हात्रे (वय 7) या मुलाला जन्मतः क्लेफ्ट आजार झाला; परंतु तो सहा महिन्यांचा असताना त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. वाशी येथे राहणारी इशा वाघे (वय 10) या चिमुरडीवरही सहाव्या महिन्यात पहिली, अकराव्या महिन्यात दुसरी आणि 10व्या वर्षी तिसरी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे इतर मुलींप्रमाणे तिच्या चेहऱयावरही हास्य दिसत आहे, असे तिची आई राजश्री वाघे यांनी सांगितले.