आरोग्यसंपदा : औषधी औदुंबर

>>प्रतिनिधी

औदुंबर वृक्ष दत्तगुरूला भारी प्रियपण त्याबरोबरच उंबराच्या झाडाचे इतरही अनेक उपयोग आहेत.

दत्तगुरू ज्या वृक्षाखाली असतात अशी भावना असलेला वृक्ष म्हणजे औदुंबर… उंबर… उंबराची फळं उपयुक्त असतातच, पण उंबराच्या वृक्षाची लाकडे यज्ञासाठी वापरली जातात. त्याव्यतिरिक्त हा वृक्ष कुणी तोडत नाही. कच्ची उंबरे हिरव्या रंगाची तर पिकल्यावर लाल, गुलाबी रंगाची बनतात. मार्च ते जूनदरम्यान फळं येतात. उंबराच्या जवळ जर विहीर खोदली तर भरपूर पाणी लागते. त्याची फळे भरपूर मिळतात, परंतु उंबराला फुले मात्र दिसत नाहीत.

उपचारासाठी उंबराची साल, पाने, मुळं तसेच त्यातून निघणारा दुधासारखा पांढरा द्रव या सगळ्याचा उपयोग केला जातो. उंबराचे फळ चवीला तुरट असते, पण शरीरातील कफ व पित्तदोषांचे हे संतुलन ठेवते. सूज कमी करणारा, वेदनाशामक, पचायला जरा जड. तात्पर्य पोटातील अग्नी विझविणारा तसेच असह्य वेदना कमी करणारा म्हणून हा प्रसिद्ध आहे. आगीत होरपळल्यावर जळलेल्या त्कचेकर याच्या सालीचा लेप लावल्यास वेदना हमखास कमी होतात.

अनेक विकारांवर गुणकारी

उंबराचा पांढरा द्रवही शरीरातून बाहेर पडणाऱया अनेक स्रावांना रोखतो. जसे रक्त, मल-मूत्र आदी. याच्या फळांचे सेवन केल्याने पुरुषाचे वीर्य व शक्ती वाढते. तसेच मन सदैव प्रसन्न राहते. फोडं-मुरुमावर याचा रस लावल्यास ते लवकर पिकतात. याच्या मुळांचा रस शरीराची आग शांत करतो. रक्तस्राव रोखणारा तसेच नियमित सेवन केल्यास क्षयरोग व मधुमेह सामान्य करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे.

उंबराचे असेही उपयोग

> नाकातून रक्त येत असेल तर उंबराच्या पिकलेल्या फळाचा रस त्यात गूळ वा मध घालून प्यावा. हाच उपाय मासिक पाळीत अधिक रक्तस्राव असल्यासही हेच प्रमाण घ्याके.

> ग्रीष्म ऋतूतील गरमी किंवा आग उत्पन्न करणारे विकार तसेच देवीच्या आजारासारख्या विकारात फोड आल्यावर पिकलेल्या फळाचा रस त्यात साखर टाकून तयार केलेलं सरबत प्यावे.

> मधुमेह झाल्यास उंबराच्या कोवळ्या पानांचा रस त्यात २० मिली. मध घालून प्रत्येक दिवशी २-३ वेळा प्यायल्याने वारंवार लघवीला जावे लागत नाही. तसेच लघवीतील साखरेचे प्रमाण सामान्य होण्यास मदत होते.

> जिभेला फोडं येणे, चट्टे पडणे, हिरडय़ांतून रक्त वाहणे, दातदुखी, दात हलणे या विकारांवर याची साल किंवा पानांचा काढा तयार करून तो तोंडात ठेवावा.

डोळ्यांची होणारी जळजळ थांबवतो

> उंबराचा आणखी एक चांगला उपयोग म्हणजे हातापायांची त्वचा फाटल्यास किंवा पायांच्या तळव्यांना कात्रे पडल्यास होणाऱया वेदना कमी करण्यासाठी उंबराच्या पांढऱया द्रव्याचा लेप लावल्याने जखम भरून सामान्य होण्यास मदत होते. डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांची जळजळ आदी लक्षणं उत्पन्न झाल्यास उंबराच्या पानांचा काढा करून स्वच्छ कपडय़ाने गाळून घ्यावा व थंड झाल्यावर डोळ्यांत त्याचे 2-2 थेंब दिवसातून 4 वेळा टाकावे. नेत्रज्योती तेज होते.

> त्वचाविकारात त्वचेचा रंग बिघडला तर उंबराच्या फांदीला येणारे कोंब वाटून तो लेप त्वचेला लावावा. उंबराची पिकलेली फळं खाल्ली तर गर्भाशयाच्या मांसपेशींना बळ मिळते आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी होते.

> लहान मुलांना पातळ शौचास होत असेल तर उंबराच्या रसात साखर घालून ते सेवन करावे. शरीरातील रक्त व पित्त दूषित होऊन अंगाची जळजळ झाल्यास उंबराच्या सालीचा काढा पोटात घ्यावा. सतत तहान लागत असल्यासही हाच काढा घेतल्यास फायदा होतो. तसेच नाक, तोंड व गुदद्वारातून रक्त पडले तर हाच काढा फायद्याचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या