‘सामना’च्या बातमीची दखल; चंद्रभागेत मैलामिश्रित पाणी सोडले जाते, मुंख्यमंत्र्यांची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुनील उंबरे । पंढरपूर

पंढरपूर शहराला १९ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो आणि सांडपाण्याची व्यवस्था ८ एमएलडीची आहे. सांडपाणी शुद्धीकरणाची यंत्रणा तोडकी असल्याने अतिरिक्त ११ एमएलडी सांडपाणी शुद्धीकरण न करता ते थेट चंद्रभागेच्या पात्रात जाते अशी धक्कादायक कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. शिवसेनेच्या उपनेत्या आणि आमदार निलमताई गोऱ्हे यांनी वारकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा विषय सभागृहात उपस्थित करून सरकारला धारेवर धरले.

चंद्रभागा नदीच्या पावित्र्याविषयी प्रश्न उपस्थित करताना आमदार गोऱ्हे यांनी नदीचे प्रदूषण, वाळवंटातील अस्वच्छता आणि वाळू चोरांच्या खड्डयांकडे शासनाचे लक्ष वेधले. वारकरी सांप्रदायात चंद्रभागेच्या स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे. श्री विठ्ठलाचे दर्शन करण्यापूर्वी पंढरपूर मध्ये आलेला भाविक चंद्रभागेचे स्नान न चुकता करतो. या चंद्रभागेच्या पवित्र पात्रात मैलामिश्रित पाणी सोडले जाते. केवळ ड्रीनेजचे पाणी नाही तर नदी तीरावर असलेल्या मटणांच्या दुकानातील रक्तमिश्रित अशुद्ध पाणी थेट पात्रात जात आहे. शासनाची ही कृती श्री विठ्ठल भक्तांच्या भावना दुखावणारी आहे.

शासनाने ड्रीनेज आणि इतर जे सांडपाणी थेट नदीत जाते आहे ते त्वरित थांबविण्यासाठी शासनाने पावलं उचलावी. पात्रात वाळू चोरटयांनी वाळू चोरून नेल्याने मोठमोठे खड्डे पडले या आहेत. ते खड्डे तातडीने बुजवावेत. धरणातील पाणी सोडल्यानंतर या खड्डयांचा अंदाज न आल्याने स्नानांसाठी गेलेल्या भाविकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घेताना घडल्या आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटात मोठी अस्वच्छता असते महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आदी मागण्या आमदार गोऱ्हे यांनी जोरदारपणे मांडल्या.

आमदार गोऱ्हे यांच्या निवेदनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर देताना चंद्रभागेत ११ एमएलडी अस्वच्छ पाणी थेट पात्रात जात असल्याची कबुली सभागृहाला दिली. हे पाणी थोपविण्यासाठी ५९ . ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.

‘सामना’च्या बातमीची सभागृहात दखल
चंद्रभागेच्या पावित्र्याविषयी दैनिक ‘सामना’ने जोरदार आवाज उठविला होता. या बातम्यांची दखल घेत आमदार गोऱ्हे यांनी सभागृहात ‘सामना’च्या बातमीचा आवर्जून उल्लेख केला.