मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे नगरकरांवरील संकट टळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यात मंगळवारी रात्री आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा अत्यल्प होता. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवेदनशीलतेमुळे कोरोना रुग्णांना प्राणवायू मिळाला. रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी फोन केला. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिले आणि नगर जिह्यासाठी ऑक्सिजनचे दोन टँकर रात्रीच मिळाले. दरम्यान, ‘कोरोना संकटात राजकारण करू नका, एकत्रपणे संकटाचा मुकाबला करू’ अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच मांडली आहे. त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नगर जिह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. जिह्यात अनेक ठिकाणी ‘रेमडेसिवीर’सह ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने ‘आयएमए’च्या डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन परिस्थिती सांगितली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जिह्यात काल केवळ एक दिवस पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होता. नगर जिह्यात रोज 60 ते 70 टन ऑक्सिजन सध्या लागत आहे. मात्र, काल रात्री अवघा 10 ते 15 टन साठा शिल्लक राहिला होता. जिल्हाधिकाऱयांनी संबंधित रुग्णालयांशी थेट संपर्क करून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार काल रात्री जिल्हा रुग्णालयातून काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरविला होता. जिह्यातील काही उद्योजकांनीही त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांसाठी दिले होते.

खासदार डॉ. विखेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

ऑक्सिजनचा साठा कमी झाल्याने खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याची विनंती केली. ‘पोलीस बंदोबस्तात हे टँकर जिह्यात दाखल झाल्यानंतर रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला असून, रुग्णालयांचे काम रात्रीत सुरळीत झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो,’ असे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी म्हटले आहे.