
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण किंवा धर्माविरुद्ध नाही तर ते कोरोनाविरोधात आहे. कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. त्यामुळे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. केंद्र सरकारनेही सणांदरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून सरकारला काळजी घ्यायला सांगितली आहे, तसे पत्र त्यांनी पाठवले आहे. त्यामुळे आंदोलनाची खुमखुमी असणाऱयांना केंद्र सरकारचे पत्र मला दाखवायचे आहे, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी भाजप आणि मनसेला सुनावले.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उभारलेल्या ऑक्सिजन प्लाण्टचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी कोरोना महामारीच्या काळात राजकारण करणाऱया विरोधकांची चांगलीच हजेरी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दहीहंडीच्या उत्सवाला उजाळा दिला. ते म्हणाले, दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची जाणीव आहे. तो थरार, ते उधाण अजूनही आठवते. पण गर्दी करून उत्सव साजरा करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे.
कशाला आशीर्वाद, जनतेचे जीव धोक्यात घालायला?
जनता जगली काय? त्यांचे प्राण गेले काय? आम्हाला 100 टक्के राजकारण करायचे आहे. समोर कोरोनाच्या तिसऱया लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानासुद्धा आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला जनतेसाठी नवीन सोयीसुविधा करायच्या नाहीत, पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येऊ शकतील असे सभा-समारंभ करायचे आहेत. का तर, आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजे आहेत. कशाला आशीर्वाद… जनतेचे जीव धोक्यात घालायला, असा थेट सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला. या सर्व घाणेरडय़ा राजकारणापासून बाजूला राहून आपण सगळेजण जनतेच्या हितासाठी काम करीत आहात. त्याबद्दल तुमचे काwतुक करतो, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
हे स्वातंत्र्य युद्ध नाही!
काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करून दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. कोरोना रोखण्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट कोरोना वाटप. जगामध्ये आज ज्या काही गोष्टी मानल्या गेल्या आहेत की मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्राने दिलेल्या पत्रात हे नमूद केले आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.





























































