
कोस्टल रोडवर रविवारी सकाळी विचित्र अपघात झाला. पोर्श कारने मधील बॅरिकेड्सला, नंतर एका वाहनाला धडक दिली. या धडकेत एका मुलीला किरकोळ दुखापत झाली. त्यानंतर ती कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जाऊन धडकली. या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दक्षिण मुंबईतील कोस्टलवर गेल्या काही दिवसांपासून वाहन अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. आज सकाळी साडेआठच्या सुमारास उत्तर दिशेकडे (नॉर्थ बॉण्ड)कडे विचित्र अपघात झाला. पोर्श कार ही उत्तर दिशेकडून जाणाऱ्यां मार्गिकेवरून जात होती. कार ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या मागील भागात पोहचली तेव्हा चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार मधील दुभाजकावर जाऊन धडकली. तेव्हा कुलाबा येथील एक डॉक्टर त्या दुसऱ्यां वाहनातून प्रवास करत होते. पोर्श कारने मागून त्यांच्या कारला धडक दिली. पोर्श कारच्या चालकाने वेळेवर एअर बॅग उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात वाचला. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे. तसेच अपघातामुळे कोस्टल रोडवर काही वेळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. काही दिवसांपूर्वी कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला आग लागली होती. त्या घटनेनंतर कोस्टल रोडवरील वाहतूक टप्प झाली होती. त्यापाठोपाठच रविवारी भरधाव कारला अपघात झाला.
पोर्शेचा चालक नशेत असल्याचा संशय
पोर्शे कारचा चालक दारू वा अन्य अमली पदार्थाच्या नशेत होता का, याचा तपास पोलिसांमार्फत करण्यात येत आहे. चालकाला रक्त तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहे. रक्त तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चालक नशेत होता की नाही, हे उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले. डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी पोर्श कार चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस कारच्या मालकाचा शोध घेत आहेत.






























































