
मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे अद्याप 20 टक्के काम बाकी असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये हा मार्ग सुरू करण्याची डेडलाइन हुकणार आहे. या मार्गाची किमान एक लाइन नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात येणार होती. मात्र ही लाइन सुरू केल्यास उर्वरित कामावर विपरीत परिणाम होऊन हे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेला कोस्टल रोड आता मे 2025 मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे.
पालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधनाची, तर 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबईकरांसाठी फायदेशीर आणि पर्यावरणस्नेही ठरणार आहे. ऑक्टोबर 2018 पासून काम सुरू झालेल्या प्रकल्पाचे सद्यस्थितीत एकूण 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गात एकूण 10.58 किमीच्या कोस्टल रोड प्रकल्पात 2 किमीचे दोन महाकाय बोगदे तयार करण्यात आले असून पहिल्या बोगद्याचे काम 10 जानेकारी 2022 ला पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे काम 30 मे रोजी पूर्ण झाले आहे. त्यामुळे कोस्टल रोड नोव्हेंबरपर्यंत एक लेन सुरू करून प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू होता. तसे प्रशासनाकडून जाहीरही करण्यात आले होते. मात्र शिल्लक कामावर परिणाम होणार असल्याचे प्रतीक्षा आणखी लांबण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
सल्लागारावरील खर्च 15 कोटींनी वाढला
कोस्टल रोडसाठी सुरुवातीला 12 हजार कोटींचे नियोजन करण्यात आले, मात्र प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च 721 कोटींनी वाढला आहे. तर नवीन कामे वाढल्यास खर्च आणखी वाढू शकतो. तर चार सल्लागारांवर दरमहा होणारा अडीच कोटी खर्च प्रकल्प सहा महिने रखडल्याने किमान 15 कोटी खर्च सल्लागारावर वाढला आहे.
म्हणूनच वाढले काम
स्थानिक मच्छीमारांनी पिलरमधील अंतर काढकण्याची मागणी केल्यामुळे 60 मीटरचे अंतर 120 मीटरपर्यंत वाढवण्यात आले. यामुळे मार्गाचे कामात वाढ झाली. शिवाय कोरोनाचा बसलेला फटका, न्यायालयीन कार्यवाहीत गेलेला वेळ यामुळे हे कोस्टल रोडची नोव्हेंबर 2023 ची डेडलाइन पाळणे शक्य होणार नसल्याचे कोस्टल रोड प्रशासनाचे म्हणणे आहे.
























































