मेरा नाम है शंकर!

श्रीशंकर महाराज समाधिस्थ झाल्यावरही त्यांच्या अस्तित्वाची प्रचीती भक्तांना येत होती, आजही येत आहे आणि यापुढेही येत राहील. श्रीमहाराजांच्या सगुण आणि निर्गुण रूपाचे दर्शन आजवर अनेकांना घडले आहे. अनेकांना थेट किंवा संचाराच्या माध्यमातून, स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून श्रीमहाराजांचे अस्तित्व जाणवते, त्यांच्या लीलानुभवाचे विलक्षण दाखले प्राप्त होतात. त्यामुळे श्रीमहाराजांच्या समाधी मठाला भेट देणाऱयांची संख्या लाखोंच्या घरात आहे. आर्थिक, मानसिक, शारीरिक, प्रापंचिक, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक अशी कोणतीही समस्या असो, श्रीमहाराजांच्या भक्तांचे पाय आपसूकच समाधी मठाच्या दिशेने वळतात. पुणे शहराच्या कात्रज रस्त्यावरील धनकवडी परिसरात हा ‘कैलास का रेहनेवाला’ तुमच्या आमच्यासाठी स्थिर झाला आहे. दहा मौलिक वचनांतून तो आजही आपल्याला चांगले आयुष्य जगण्याचे योग्य पर्याय सुचवीत आहे. मार्गभ्रष्ट झालेल्या भक्ताला योग्य मार्गावर आणून सोडत आहे.

पूर्वी श्रीमहाराजांची समाधी मोकळ्या जागेत होती, कालांतराने बाबुराव रुद्रकरांसारख्या अनेक शंकरभक्तांनी समाधीची व्यवस्था उत्स्फूर्तपणे आपल्या खांद्यावर घेतली. हळूहळू विटांची भिंत, त्यानंतर पत्र्याची छोटी शेड असा प्रवास करीत या समाधीमठाचे आजचे भव्य रूप भक्तांच्या देणगीतून साकारलेले आहे. मूळच्या समाधीस्थानावर उभारलेल्या या वास्तूचे गाभारा आणि सभामंडप असे दोन भाग आहेत. गाभाऱयामधील श्रीमहाराजांची समाधी संगमरवरी दगडातून बांधलेली आहे. समाधीच्या दक्षिणेस श्रीशंकर महाराजांची संगमरवरात घडवलेली सुरेख उत्तराभिमुखी मूर्ती आहे. समाधीच्या उत्तरेस श्रीमहाराजांच्या पादुका आहेत. समाधी आणि पादुकांवर आकर्षक फुलांची सजावट दररोज करण्यात येते. विशेष म्हणजे शंकरभक्तांना पादुका आणि समाधीवर मस्तक टेकवून श्रीमहाराजांचे दर्शन घेता येते.

श्रीमहाराजांनी समाधी घेतल्यानंतर बऱयाच वर्षांनी, समाधी मंदिरातील श्रीमहाराजांची ही मूर्ती डॉ. भोई यांच्या पुढाकाराने जयपूर येथून आणण्यात आली. विलक्षण चैतन्यमयी अशा या मूर्तीचे दोन्ही गुडघे श्रीमहाराजांच्या खांद्यापर्यंत उंच असून दोन्ही पायांना श्रीमहाराजांच्या आजानुबाहूंचा सुंदर विळखा आहे. तेजस्वी डोळे, तीक्ष्ण नजर, धारदार नाक, भरघोस दाढीमिश्या व डोक्यावर फेटा अशा स्वरूपातील श्रीमहाराजांची मूर्ती पाहताक्षणी भक्तांच्या मनाचा ठाव घेते. त्याशिवाय, गाभाऱयामध्ये श्रीगुरुस्वामीसमर्थ, भक्त जनार्दनबुवा अर्थात जनुबुवा आणि शिष्य श्रीशिवाजी महाराज यांच्या छायाचित्रांसह श्रीशंकर महाराजांच्या विविध भावावस्था दाखविणारी अनेक चित्रे आहेत.

श्रीमहाराजांच्या समाधी मठामध्ये प्रवेश करताना सर्वप्रथम मठाच्या उजव्या बाजूस नळावर पाय धुऊन नंतरच प्रवेश करता येतो. डाव्या बाजूस प्रशस्त इमारतीच्या पहिल्या मजल्यावर श्रीमहाराजांच्या अवतारकार्यातील महत्त्वाचे प्रसंग चित्ररूपात साकारलेले पाहावयास मिळतात. समाधी मंदिरासमोर श्रीमारुतीचे मंदिर आहे. जवळच तीन औदुंबर आहेत. मधल्या औदुंबराच्या बुंध्याशी त्रिशूळ आणि खडावा आहेत. तिथेच जुनाट वटवृक्ष आणि पाण्याची प्रशस्त विहीर आहे. समाधी मंदिरासमोर व उजव्या बाजूस श्रीदत्त, श्रीदेवी अन् श्रीस्वामीसमर्थ यांचे छोटेखानी मंदिर आहे. समाधी मठाचा परिसर शांत व रमणीय आहे. श्रीमहाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन सभामंडपात नामस्मरण, आरती करण्यासाठी भक्तांची गर्दी होते. श्रीमहाराजांची त्रिकाळ पूजा केली जाते. प्रत्येक दुर्गाष्टमीला श्रीमहाराजांचा पालखी उत्सव होतो. महत्त्वाच्या उत्सवामध्ये महाप्रसाद दिला जातो तसेच दररोज श्रीमहाराजांना प्रिय असलेल्या खिचडीचा प्रसाद भक्तांना देण्यात येतो.

‘अशक्य ते मजला शक्य’ असे ठामपणे सांगणारे, चराचरांत वसलेले श्रीशंकर महाराज येथे भक्तरक्षणार्थ सदैव जागृतावस्थेत स्थिर आहेत. अलौकिक अवतारकार्याद्वारे, आध्यात्मिक जगतात स्वतःचा ठसा उमटविणारे श्रीशंकर महाराज तुमच्या आमच्याकरिता ‘माऊली’ स्वरूप धारण करते झाले, मात्र त्यांच्याविषयीच्या भक्तिभावाची ‘जाणीव’ आपल्या मनामध्ये निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे.

– चैतन्यस्वरूप ([email protected])

आपली प्रतिक्रिया द्या