
सामना प्रतिनिधी । मुंबई
मोबाईलवरून तिकिटे काढण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असून शुक्रवार, 12 जुलै रोजी मध्य रेल्वेच्या झोनने आणि मुंबई डिव्हिजनने एकाच दिवसात सर्वाधिक मोबाईल तिकिटांची विक्री करून अनोखा विक्रम केला आहे. मध्य रेल्वेच्या संपूर्ण झोनमध्ये शुक्रवारी 63 हजार 313 मोबाईल तिकिटांची विक्री झाली तर मुंबई डिव्हिजनमध्ये 61 हजार 196 मोबाईल तिकिटांची विक्री झाली आहे.
विभाग प्रवाशांची संख्या कमाई
मुंबई 3,30,639 29,04,597 रु.
भुसावळ 2,129 44,265 रु.
नागपूर 933 25,600 रु.
पुणे 3,499 57,096 रु.
सोलापूर 964 13,870 रु.
रेल्वेच्या खिडक्यांवर तिकिटांसाठी मोठमोठय़ा रांगा लागत असल्याने मोबाईलवरील तिकिटांच्या सोयीमुळे प्रवाशांची तिकीट खिडकीवरील रांगांपासून मुक्तता झाली आहे. सुटे पैसे कटकट संपली, कॅशलेस व्यवहार होत असल्याने कागदाची तसेच वेळेचीदेखील बचत होत असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
मुंबई वगळता मध्य रेल्वे झोनची कामगिरी
मध्य रेल्वेच्या संपूर्ण झोनमध्ये शुक्रवारी एकाच दिवसात झालेल्या 63,313 तिकिटांच्या विक्रीमध्ये पुणे विभागात 1 हजार 263, भुसावळ विभागात 492, नागपूर विभागात 252 आणि सोलापूर विभागात 147 मोबाईल तिकिटांची विक्री झाल्याचे आकडेवारीद्वारे सिद्ध झाले आहे.
मध्य रेल्वेवरील ‘नो बिल, नो पेमेंट’ मोहिमेला यश
मध्य रेल्वेवरील खानपान स्टॉलवाल्यांना ‘पीओएस’ मशीन बंधनकारक केल्यानंतर आता खाद्यपदार्थांचे बिल देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे जो कॅण्टीन चालक बिल देणार नाही त्याला त्या खाद्यपदार्थाचे पैसे न देण्याचे आवाहन मध्य रेल्वेने करीत ‘नो बिल, नो पेमेंट’ अशी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कॅण्टीन आणि स्टॉलधारकांकडून खाद्यपदार्थांच्या खरेदीनंतर 14 हजार ग्राहकांना आतापर्यंत बिल अदा करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध वस्तूंची विक्री करणारे 242 स्टॉल्स आहेत. ‘नो बिल, नो पेमेंट’ या मोहिमेच्या अंमलबजावणीनंतर मध्य रेल्वेवरील स्टॉलधारकांकडून खाद्य वा तत्सम वस्तूंच्या खरेदीनंतर आतापर्यंत 14 हजार ग्राहकांना बिल देण्यात आले आहे. तसेच ‘पीओएस’ मशीनद्वारे 70 ग्राहकांनी ऑनलाइन व्यवहार केला आहे, तर 694 ग्राहकांनी पेटीएममधून बिलाचे पैसे भरले आहे अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
232 स्टॉल्सवर पीओएस मशीनची सुविधा
रेल्वे मंत्रालयाने नुकतेच स्टॉलवर ऑनलाइन व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी पीओएस मशीन (पॉइंट ऑफ सेल) बसविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 242 पैकी 232 स्टॉल्समध्ये आतापर्यंत ‘पीओएस’ मशीन बसविण्यात आल्या आहेत, तर उर्वरित स्टॉलवर लवकरच ‘पीओएस’ मशीन बसविण्यात येणार आहेत.
























































