
सामना ऑनलाईन । बंगळुरू
आजवर आपण ओला आणि तत्सम टॅक्सीचालकांकडून प्रवाशांसोबत गैरवर्तन झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. पण बंगळुरूत तर चक्क प्रवाशांनीच चालकाचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. हे प्रकरण इथवरच न थांबता प्रवाशांनी त्याच्या बायकोला धमकावून न्यूड व्हिडीओ कॉलही करायला लावला आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सोमाशेखर नावाच्या या टॅक्सीचालकाला 30 नोव्हेंबर रोजी अदुगोडी ते डोमासंद्रा असं टॅक्सीचं बुकिंग मिळालं होतं. चार माणसांनी बुक केलेल्या या प्रवासाला रात्री साडे दहा वाजता सुरुवात झाली. गाडीत बसल्यानंतर काही वेळाने चारही आरोपींनी सोमाशेखरला मारहाण करत त्याच्याकडील पैसे लुटले. त्याच्या बँक खात्यातील तसेच पेटीएम खात्यातील पैसेही त्यांनी धमकावून लुटले.
त्यानंतर त्यांनी सोमाशेखरला धमकावून त्याच्या फोनवरून त्याच्या बायकोला व्हिडीओ कॉल केला. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या आरोपींनी त्याच्या बायकोला धमकी दिली आणि तिला विवस्त्र व्हायला भाग पाडलं. त्यानंतर त्या व्हिडीओचे अश्लील स्क्रीनशॉटही त्यांनी घेतले. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी सोमाशेखरने लघवीला जाण्याची परवानगी मागितली आणि तिथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी त्याने पोलिसांत या प्रकरणाची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
























































