
अवकाळी पावसाने अलिबाग जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शिष्टमंडळाने अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ याची भेट घेऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या याबाबत निवेदन दिले.
तालुकाप्रमुख राजा केणी, संघटक सतीश पाटील, माजी सरपंच शंकर गुरव, संतोष निगडे, सुरेश म्हात्रे, शहरप्रमुख संदीप पालकर, मारुती भगत, सरपंच प्रफुल पाटील, नंदकुमार पाटील या शिष्टमंडळाने तहसीलदार याची भेट घेतली. अवेळी पावसाने जिल्ह्यातील ऐंशी टक्के नुकसान झाले. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले. शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या या समस्येबाबत तालुकास्तरावर तहसीलदार यांना भेटून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिले आहेत. त्यानुसार आज अलिबाग तालुका शिवसेनेतर्फे शिष्टमंडळाने तहसीलदार सचिन शेजाळ यांची भेट घेऊन निवेदन दिले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी सूचना शिष्टमंडळाने तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही शिष्टमंडळाने घेतली भेट
जिल्हा सामान्य रुग्णालय हे सध्या समस्येने ग्रासलेले आहे. डॉक्टरांची कमतरता असल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उपचारा अभावी आपला जीव गमवावा लागत आहे अथवा खासगी रुग्णालय किंवा मुंबईकडे धाव घ्यावी लागत आहे. या समस्येबाबत शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी याची भेट घेऊन जाब विचारला. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभार लवकरात लवकर सुधारावा अशी तंबीही शिष्टमंडळाने दिली आहे.
तुम्हीच रुग्णालयाला डॉक्टर द्या, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अजब उत्तर
जिल्हा रुग्णालयातील एनआरएचएम डॉक्टरांना मानधन दिले नसल्याने ते कामावर येत नाही. डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत शासनाला कळविले असल्याचे डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावर नवीन डॉक्टरांची भरती करण्याबाबत शिष्टमंडळाने सांगितले असता, तुम्हीच डॉक्टर द्या असे अजब उत्तर डॉ. अजित गवळी यांनी शिष्टमंडळाला दिले. या उत्तराने सारेच निरुत्तर झाले.


























































