
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
जम्मू-कश्मीरमध्ये राज्यपाल राजवट जारी झाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑल आऊट’चे जंग छेडले आहे. तर दुसरीकडे त्या ऑपरेशनवरून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चकमकी झडू लागल्या आहेत.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोज यांनी पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्या समर्थनाचा सूर आळवला आहे. तर त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी कश्मीरमध्ये ‘नरसंहार’ होत असल्याचा आरोप करताच पाकिस्तान ‘लष्कर-ए-तोयबा’ त्यांच्या पाठीशी उभी ठाकली आहे. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मोदी सरकारच्या काळात मे २०१८ पर्यंत कश्मीरमध्ये ६६० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, असा दावा केला. त्यांनी गुलाम नबी आझाद यांचा नरसंहाराचा आरोप फेटाळून लावला.
कोण काय म्हणाले?
कश्मिरींची पहिली पसंती ‘आझादी’ हीच आहे, असे परवेज मुशर्रफ म्हणायचे. त्यांचे म्हणणे तेव्हाही खरे होते आणि आजसुद्धा खरे आहे. कश्मिरींना स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला तर ते ‘आझादी’च पसंत करतील.
– सैफुद्दीन सोज, काँग्रेस नेते
सैफुद्दीन सोज हे केंद्रीय मंत्री होते. त्यावेळी त्यांनी सरकारच्या मदतीने आपल्या कन्येला कश्मीर लिबरेशन फ्रंटच्या तावडीतून सोडवले होते. जर त्यांना मुशर्रफ आवडत असतील तर आम्ही पाकिस्तानचे तिकीट देण्यास तयार आहोत.
– डॉ. सुब्रह्यण्यम स्वामी, भाजप नेते
कश्मीरमध्ये चार दहशतवादी मारले जातात. पण त्याचवेळी २० नागरिकांनाही जीव गमवावा लागतो. सरकारची कारवाई दहशतवाद्यांपेक्षा नागरिकांनाच चिरडणारी असते. पुलवामा येथे एका दहशतवाद्याचा खात्मा झाला, पण १३ सामान्य रहिवासी मारले गेले. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ म्हणजे नरसंहाराचेच दुसरे नाव आहे.
– गुलाम नबी आझाद, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
पाकिस्तान आजकाल काँग्रेसच्या सुरात सूर लगेचच मिळवताना दिसतो. शहीद जवान औरंगजेब याच्या घरी संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांनी दिलेल्या भेटींना गुलाम नबी आझाद ‘ड्रामा’ म्हणतात. काँग्रेस जवानांचे मनोबल खच्ची करत आहे. त्या पक्षाला ३३ खासदारांवरून १४ वर यायचे असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
– रवीशंकर प्रसाद, केंद्रीय कायदामंत्री
लष्कर-ए-तोयबा गुलाम नबींच्या पाठीशी
जम्मू-कश्मीरमधील ऑपरेशन ऑल आऊट म्हणजे नरसंहाराचे दुसरे नाव आहे, असे वक्तव्य गुलाम नबी आझाद यांनी करताच पाकिस्तानात ‘लष्कर-ए-तोयबा’ ही दहशतवादी संघटना त्यांच्या समर्थनार्थ उभी ठाकली आहे. गुलाम नबी आज जे काही म्हणत आहेत, तेच आम्ही अगदी सुरुवातीपासून सांगत आलो आहोत, असे ‘लष्कर’चा प्रवक्ता अब्दुल्ला गजनवी म्हणाला. कश्मीरमधील राज्यपाल राजवट ही निरपराध नागरिकांचा संहार करण्यासाठीच आहे, असा आरोप करतानाच हिंदुस्थानचे हे पाऊल कत्तली वाढवेल, असा इशारा गजनवी याने दिला आहे.
– काँग्रेस नेते सैफुद्दीन सोज यांनी ‘कश्मीर : ग्लिम्पसेसे ऑफ हिस्ट्री अॅण्ड द स्टोरी ऑफ स्ट्रगल’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी मुशर्रफ यांच्या ‘कश्मीरींच्या आझादी’वरील विधानाचे समर्थन केले आहे. त्यांचे पुस्तक चालू महिन्यातच प्रकाशित होत आहे.
– काँग्रेस नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी कश्मीरमध्ये नरसंहार होतोय, असे वक्तव्य शुक्रवारी एका वृत्तवाहिनीवर बोलताना केले.



























































