काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाचा प्रताप, वाळूचा ट्रॅक्टर पकडल्याने नायब तहसीलदाराला केली धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

चाकूर तालूक्यातील मौजे नळेगाव येथील काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने त्याचा अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर नायब तहसीलदाराने पकडल्याने  नायब तहसीलदारास धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या बाबत शेषेराव शिवराम टिप्परसे नायब तहसीलदार चाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे.

चाकूर तहसील कार्यालयाच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूकीवर खटले दाखल करत असताना आज नळेगाव येथे तलाठी अविनाश पवार, अनिरुध्द जगताप मंडळ अधिकारी, सदानंद क्षीरसागर कोतवाल यांच्या पथकाने  ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला परंतू त्याने ट्रॅक्टर सिध्देश्वर मंदिर परिसरात नेले. त्यास ट्रॅक्टर नळेगाव दुरक्षेत्र येथे घेण्यास सांगितले होते. त्याचवेळी मोटारसायकलवर अमोल रामराव बुद्रे हा त्या ठिकाणी आला. तुम्ही माझे ट्रॅक्टर का पकडता असे म्हणून हुज्जत घातली  व शिवीगाळ केली, ट्रॅक्टरमधील वाळू खाली टाकून ट्रॅक्टर भरधाव वेगात घेऊन गेला. या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.