राहुल गांधी आणि गोवा भाजपात ‘ट्विटर वॉर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

विश्रांतीसाठी गोव्यात आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल ऑडीओ क्लिप वरुन माजी संरक्षण मंत्री तथा गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना चिमटा काढत राफेलचा विषय जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘राफेल ऑडिओ क्लिप उघड होऊन 30 दिवस झाले. मात्र अद्याप एफआयआर किंवा तपासाचे आदेश देण्यात आलेले नाहीत. शिवाय आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर कारवाईही झालेली नाही. त्यामुळे क्लिपमधील संभाषणात तथ्य असल्याचे स्पष्ट होते’, अशा आशयाचे ट्वीट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी सध्या विश्रांतीसाठी गोव्यात आले आहेत. काल दक्षिण गोव्यातील फिशर्मन्स वार्फ या सी फूड साठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये त्यांनी गोवन सी फूडचा आस्वाद घेतला. राहुल गांधी जेव्हा तेथे आले होते त्याच वेळी व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या रचना फर्नांडिस देखील तेथे आल्या होत्या. त्यांनी राहुल गांधी यांच्या सोबत काढून घेतलेला फोटो फेसबुक वर पोस्ट केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आज दिवसभर तोच फोटो चर्चेत होता.

दुपारी गोवा भाजपने एक ट्वीट करून गोव्यात आलेल्या राहुल गांधी यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांनी राहुल गांधी यांना गोव्यातील सर्व काँग्रेस आमदारांसह मांडवी नदीवर उभारलेल्या तिसऱ्या केबल स्टेड ‘अटल सेतू’ला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे.

bjp-goa

गोवा भाजपच्या ट्वीट नंतर राहुल गांधी यांनी देखील राफेल ऑडीओ क्लिप वर एक महीना उलटून देखील अद्याप कोणतीच कारवाई का झाली नाही असा प्रश्न करत त्या क्लिप मधील माहिती खरी असल्यानेच त्यावर पुढे कारवाई झाली नसल्याचा आरोप करत भाजपवर पलटवार केला आहे.